Marunji Crime News : पतीसोबत वॉक करुन घरी येताना टवाळखोरांकडून विवाहितेचा विनयभंग

एमपीसी न्यूज – सायंकाळी पतीसोबत वॉक करुन घरी येताना विवाहित महिलेचा काही टवाळखोरांनी विनयभंग केला. दाम्पत्य फेरफटका मारत असताना एकजण महिलेसमक्ष लघुशंकेसाठी उभा राहिला तर, इतरांनी अश्लील शेरेबाजी केली. शिंदे वस्ती, मारुंजी, मुळशी येथे सोमवारी (दि.07) सायंकाळी सातच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

गणेश मोहन बुचडे (रा. शिंदे वस्ती, मारुंजी), संतोष पंडित गुंजाळ (रा. म्हातोबा नगर, काळा खडक) आणि संदीप गजानन भुरकाडे (रा. शिंदे वस्ती, मारुंजी) अशी अटक आरोपी यांची नावे आहेत.

याप्रकरणी पिडित महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला व तिचे पती हे सोमवारी सायंकाळी फेरफटका मारुन घरी चालले होते. त्याठिकाणी असलेल्या तिन्ही आरोपी पैकी आरोपी गणेश हा महिलेसमक्ष लघुशंकेसाठी उभा राहिला. तर, आरोपी संतोष याने महिलेकडे पाहून अश्लील शेरेबाजी केली. याबाबत विचारणा करण्यासाठी महिलेचा पती गेला असता त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व डोक्यात दगड घालून जखमी केले. तसेच, आरोपी यांनी स्वतःच्या कारची काच फोडली. तिन्ही आरोपी ताब्यात असून हिंजवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.