Women’s Day 2022 : महाराष्ट्र तुमचा सदैव ऋणी राहील – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे महिला दिनानिमित्त पत्र

एमपीसी न्यूज – राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील डॉक्टर, नर्सेस, वैद्यकीय अधिकारी, पॅरा मेडिकल, आशाताई, अंगणवाडी सेविका आदींना जागतिक महिला दिनानिमित्त पत्र लिहिले आहे. अडचणीच्या काळात स्त्री नेहमीच कुटुंबाची ढाल बनून उभी राहते. तुम्ही सर्व भगिनीही राज्यावरच्या या संकटात ढाल बनला आहात. महाराष्ट्रातील जनता आपली सदैव ऋणी राहील, अशा शब्दात नारीशक्तीचा गौरव केला आहे.

 

आरोग्यमंत्री टोपे यांनी पत्रात म्हटले आहे की, जागतिक महिला दिनानिमित्त आपणा सर्व भगिनींसोबत या पत्राद्वारे संवाद साधताना आनंद होतो आहे. अडीच वर्षांपूर्वी राज्याचा आरोग्यमंत्री म्हणून मी जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर अवघ्या काही काळातच कोरोनाचे संकट आपल्यासमोर उभे राहिले. या अनिश्चिततेच्या काळात कोरोना संकटाला राज्य अत्यंत धीरोदात्तपणे सामोरे गेले. या सगळ्यात महत्वपूर्ण वाटा होता तो राज्यातील महिला डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय अधिकारी, पॅरा मेडिकल, आशाताई, अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत असणाऱ्या तुम्हा सर्व भगिनींचा.!

रुग्णसेवेहून मोठे दुसरे कार्य नाही. समाजातील अर्भकांपासून वृद्धांपर्यंत त्यांच्या प्राणांचे संरक्षण करण्यासाठी सीमेवर लढणाऱ्या सैनिकाप्रमाणे स्वतःचा जीव धोक्यात घालून तुम्ही लढलात. घर आणि काम या दोन्ही आघाड्यांवर जबाबदारी खंबीरपणे पेलली. तुमच्या तत्पर सेवेमुळे आणि अविरत मेहनतीने कोरोनामुक्त महाराष्ट्राकडे आपण वाटचाल करत आहोत. आतापर्यंत अत्यंत धीरानं आपण कोरोना विरुद्ध लढत आहात. समाजाच्या सेवेसाठी हे अतुलनीय शोर्य तुम्ही न थकता दाखवत आहात.

तुमच्या या सेवेमुळे रुग्णांना तर मानसिक बळ मिळालं पण आम्हालाही त्यामुळे काम करण्याचं पाठबळ आणि प्रोत्साहन मिळालं. लॉकडाऊनच्या काळात बाकीचे नागरिक आपल्या कुटुंबियांसोबत असतांनाही आपण मात्र आपल्या कुटुंबापासून प्रसंगी क्वारंटाईन राहून कर्तव्य बजावले.

अडचणीच्या काळात स्त्री नेहमीच कुटुंबाची ढाल बनून उभी राहते. तुम्ही सर्व भगिनीही राज्यावरच्या या संकटात ढाल बनला आहात. आपण केलेल्या कार्यासाठी महाराष्ट्रातील जनता आपली सदेव ऋणी राहील. महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या वतीने आपले पुनश्चः आभार व्यक्त करत जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देतो,’ असेही पत्रात म्हटले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.