Tribute to Pratibha Divekar : ‘सेवाभावी’ प्रतिभा दिवेकर काकू

एमपीसी न्यूज – राष्ट्र सेविका समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रतिभा बळवंत दिवेकर (Tribute to Pratibha Divekar) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या सेवाभावी जीवनपटाविषयी आठवणींना उजाळा देणारा त्यांच्या सखी मंगला ओक यांनी लिहिलेला विशेष… 
‘सेवाभावी’ प्रतिभा दिवेकर काकू – Tribute to Pratibha Divekar
मी तळेगावच्या घरी कायमची राहायला आले, त्याला 32 वर्षे झाली. माझ्या पाठची जाऊ कुंदा माझ्या आधी सात वर्ष राहायला आलेली. तळेगावात घरं बांधली ती त्यांच्याच देखरेखीखाली! तिची मुलं ओंकार, अश्विनी तेव्हा अगदी चार-पाच वर्षांची लहान. मोठ्या सुरेखा, कामिनी नुकत्याच मराठी शाळेत जाऊ लागलेल्या.
हायवेपर्यंतचा सगळा माळ तसा मोकळाच होता. धनगरांच्या मेंढ्या वस्तीला बसायच्या. खालचं मारुती मंदिरही तसं गावाबाहेर. कुंदा समाजप्रिय. आजूबाजूला एखादं-दुसरं घर असलं तरी जाऊन ओळख करून घेणार. गरजच होती म्हणा ती. आणि त्यातच भेटल्या अगदी समाजशील अशा प्रतिभा दिवेकर काकू. त्या राष्ट्र सेविका समितीच्या सेविका, कार्यकर्त्या!
स्त्रियांना एकत्र आणणं, साधे साधे खेळ, उपक्रम याद्वारे स्त्रियांचे शारीरिक व बौद्धिक आरोग्य राखणं हा उद्देश. कोणाच्याही घरगुती गोष्टीत फार न पडता एकमेकींच्या अडचणी निभावणं. दुःख- संकटात आधार देणं, तसेच मंगल कार्यात मदत करणं. कोणतेही गट-तट होऊ न देता सर्वांना एकत्र आणणं. गणेशोत्सवात छोटे-मोठे करमणुकीचे कार्यक्रम.
नवरात्रात सकाळी दहा ते दुपारी बारा या वेळेत घरगुती श्रीसूक्त पठाण व संध्याकाळी पाच ते सात या वेळेत रस्त्यापलिकडच्या समाज मंदिरात देवी बसवून काहीतरी कर्मणुकीचे कार्यक्रम व सामुदायिक श्री सूक्त पठण असे. निरनिराळ्या विभागाचा एक एक दिवस ठरलेला असेल व दसऱ्याला संचलन! गणपती-नवरात्रात कार्यक्रम बसवताना पुढे पुण्यात स्पर्धेला सुद्धा छोटी नाटकं केली जात, बक्षीसंही मिळवीत.
एवढे सर्व उद्योग करताना त्यांना स्वतःचा काही प्रपंच होता की नाही?… तर ‘होता’! अगदी यथासांग होता. प्रपंचात जेवढ्या म्हणून अडचणी असतात त्या सर्व त्यांनी निभावल्या. अगदी नेटकेपणानं निभावल्या.
विदर्भातील अकोले येथे 27 फेब्रुवारी 1932 रोजीचा त्यांचा जन्म. माहेरची सिंधू देशपांडे. वर्ण सावळा, उंची व प्रकृतीही मध्यमच. तेव्हाचा काळ जुन्या वळणाचा. घरात सोवळं- ओवळं. जुने रीती-रिवाज यथासांग होणार. वडील पटवारी म्हणजे तलाठी (पण प्रामाणिकपणामुळे वरकमाई नाही). कुटुंब मात्र चौकोनी. पाठचा फक्त एक भाऊ.
सिंधूचं शिक्षण मात्र मॅट्रिक पास एवढं झालं आणि लग्नाचं पाहू लागले. बळवंतराव दिवेकर या सुजाण व सुशिक्षित मुलाशी लग्न ठरलं. सासर घर मात्र गोकुळ होतं. सासू – सासरे, दोन दीर व तीन नणंदा एवढा प्रपंच. त्या काळात आटोपशीरच म्हणायचा.
माहेरची मोठी मुलगी, सासरची मोठी सून झाली. पूर्वाश्रमीची सिंधू देशपांडे आता प्रतिभा दिवेकर म्हणून ओळखळी जाऊ लागली. दीर- नणंदांची शिक्षणं व पुढे नोकरी, लग्नं हे सर्व यथासांग मार्गी लावणं. तेव्हा बळवंतराव ‘बॅरिस्टर’ नव्हते. इथं-तिथं फुटकळ नोकऱ्या करताना त्यांनी प्रथम बीए व नंतर एलएलबी केलं. पगाराचा जवळपास 75 टक्के भाग घरी पाठवावा लागायचा व उरलेल्या 25 टक्के पगारात आपला संसार निभावायचा.
पुढे काकू नाही ‘आरोग्य सेविका’ म्हणून नोकरी लागली… आणि दूर दूर राहणं आलं. तेही त्यांनी निभावलं. इतकंच नव्हे तर संघ-समितीचे संस्कार, विचार समाजात पेरले.
पवन मावळातील शिवणे गावाचा त्यांनी कायापालटच केला. शिवणे येथील आरोग्य केंद्रात परिचारिका म्हणून त्या नियुक्त झाल्या. कामाचा व्याप तसा मोठा होता. शिवणे, मळवंडी ढोरे, परंदवडी, सडवली, आढे, ओझर्डे या गावातील महिलांच्या आरोग्यविषयक समस्या समजावून घेऊन त्या दूर करणं, त्यांना योग्य ते औषधोपचार करणं हे महत्त्वाचं काम!
त्या काळात दळणवळणाची फारशी साधने नव्हती. त्यामुळे सर्व प्रवास पायीच करावा लागे. ग्रामीण भागातील महिलांमध्ये शिक्षणाचा अभाव असल्यामुळे महिलांना विविध आजाराला व समस्यांना तोंड द्यावे लागे. कधी कधी समस्यांची मुळं कुटुंबात घुसत, मग कोणालाही न दुखवता कौशल्याने प्रश्न सोडवावा लागे.
महिला साक्षरता संघटना आणि सक्षमीकरण या त्यांनी डोंगराएवढं- पर्वताएवढं काम केलं. त्यामुळेच तर त्यांच्या निवृत्तीनंतर सर्व गाव ढसाढसा रडला! (खेड्यातील लोकांची ‘दाखवेगिरी’ नसते तशी उगाच जात-पाकही नसते). दिवेकर काकू म्हटलं की किती किती आठवतं…

वयाच्या 91 व्या वर्षी इहलोक सोडणं काही अकाली म्हणता आलं नाही तरी आपली इच्छा असतेच ना.. ‘जीवेत शरदः शतम!’
 आता बहिणाबाईची एक कविता पाहू…Tribute to Pratibha Divekar
 माझ्या जीवा
 जीव देवानं धाडला जन्म म्हणे आला आला | 
 जेव्हा आलं बोलावणं मौत म्हणे गेला गेला |
 दीस आला कामामध्ये रात्र नीजमध्ये गेली |
 मरनाची नीज जाता जलमाची जाग आली |
 नही सरलं सरलं जीवा तुझं येन जानं |
 जसा घडला मुक्काम त्याले म्हणती रे जिनं |
 आला सास गेला सास जीवा तुझं रे तंतर |
 अरे जगनं मरनं एका सासाचं अंतर |
 येरे येरे माझ्या जीवा काम पडलं अमाप |
 काम करता करता देख देवाजीचं रूप |
 ऐक ऐक माझ्या जीवा पीडायेलाच कन्हनं |
 तेरे गांजल्याले हात त्याचं ऐक रे म्हननं |
 अरे निमान तोंड्याच्या वढ पाठीवरे धांडा | 
 नाच नाच माझ्या जीवा संसाराचा झाल झेंडा |
 हास हास माझ्या जीवा असा संसारात हास |
 इडा पिडा संकटाच्या तोंडावऱ्हे काय फास |
 जग जग माझ्या जीवा असं जगनं तोलाचं |
 उच्च गगनासारिखं धरत्रीच्या रे मोलाचं |
आपल्या दिवेकर काकू असं जीवन जगल्या म्हणायला काय हरकत आहे?
– मंगला ओक, तळेगाव दाभाडे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.