Sangvi Crime News : मानलेल्या बहिणीच्या मांडीला हात लावल्याने तरुणाचा नदीत बुडवून खून

एमपीसी न्यूज – मानलेल्या बहिणीच्या मांडीला हात लावल्याने दोघांनी मिळून एका तरुणाला पवना नदीत बुडवून, हातोडीने व कमरेच्या पट्ट्याने मारून ठार मारले. ही धक्कादायक घटना मे 2021 मध्ये घडली. दरम्यानच्या कालावधीत या प्रकरणात पोलिसांच्या परस्पर अनेक घडामोडी घडल्या. चौकशीअंती 8 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करत दोघांना अटक करण्यात आली आहे.

राहुल नंदू भालेराव (वय 22) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी राहुलच्या आईने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ओंकार मिलिंद गायकवाड (वय 19, रा. पिंपळे गुरव), केदार घनश्याम सूर्यवंशी (वय 22, रा. पिंपळे गुरव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 13 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलीस निरीक्षक सुनील टोणपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ओंकार, केदार, मयत राहुल आणि एक मुलगी असे कॉमन मित्र होते. ते सर्वजण गांजा पिण्यासाठी एकत्र जमत होते. ओंकार आणि केदार या दोघांनी संबंधित तरुणीला बहीण मानले होते. गांजा पीत असताना राहुल याने त्या तरुणीच्या मांडीला हात लावला. याचा राग आल्याने ओंकार आणि केदार या दोघांनी मिळून राहुलला पिंपळे सौदागर येथे पवना नदीत नेले. तिथे लोखंडी हातोडी आणि कमरेच्या पट्ट्याने राहुलला मारहाण केली. नदीच्या पाण्यात जबरदस्तीने बुडवून राहुलला ठार मारले.

राहुलचा मृतदेह सापडल्यानंतर याप्रकरणी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. या प्रकरणाची फौजदार गायकवाड हे चौकशी करत होते. राहुलचा मृतदेह आढळल्यानंतर एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्यात दोघेजण एकाला पवना नदीत बुडवून मारत आहेत तसेच त्या दोघांच्या हातात लोखंडी हातोडी आणि पट्टा असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत होते.

राहुलच्या अकस्मात मृत्यूची, व्हायरल झालेल्या व्हिडिओची चौकशी करून याप्रकरणी तब्बल सात महिन्यानंतर डिसेंबर महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे तपास करीत आहेत.

मध्यस्थीने आरोपींकडून उकळले पावणेपाच लाख रुपये

राहुलच्या खुनाच्या गुन्ह्यातून सुखरूप बाहेर काढतो. नाहीतर तुमच्यावर खुनाचा गुन्हा दाखल होईल, अशी भीती घालून एका मध्यस्थीने आरोपींकडून तब्बल चार लाख 70 हजार रुपये उकळले. याप्रकरणी देखील खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष शंकर सरोदे (रा. प्रभातनगर, पिंपळे गुरव) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी समीर सतीश रोकडे (वय 26, रा. पिंपळे गुरव) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी समीर रोकडे, खुनाच्या गुन्ह्यातील दोन्ही आरोपी, मयत राहुल आणि संबंधित तरुणी हे पाचजण मित्र होते. फिर्यादी समीर यांचा मित्र राहुल याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या चौकशीतून सुखरूप बाहेर काढतो. अन्यथा तुमच्यावर मर्डरचा गुन्हा दाखल होईल, अशी भीती घालून आरोपीने फिर्यादी यांच्याकडून चार लाख 70 हजार रुपये जबरदस्तीने खंडणीपोटी उकळले. खुनाचा गुन्हा दाखल केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. या खंडणीच्या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक गवारी तपास करीत आहेत.

‘त्या’ फौजदारावर कारवाईची टांगती तलवार

राहुलचा मृतदेह सापडल्यानंतर याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्याची चौकशी फौजदार गायकवाड हे करीत होते. त्यांनी या प्रकरणाचा अहवाल सादर करण्यासाठी वेळ लावला आहे. अहवाल सादर करण्यासाठी विलंब लावल्याबाबत आपण पोलीस आयुक्तांना कसुरी अहवाल सादर करणार असल्याचे पोलीस निरीक्षक सुनील टोणपे म्हणाले. त्यानंतर पोलीस आयुक्त योग्य ती कारवाई करतील, असेही टोणपे यांनी सांगितले. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करणा-या फौजदारावर कारवाईची टांगती तलवार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.