Pune News : सराफा दुकानात चोरी, दोन महाविद्यालयीन तरुणी अटकेत

एमपीसी न्यूज : सराफाच्या दुकानात दागिने खरेदी करण्यासाठी आलेल्या दोन तरुणीनी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. सराफची नजर चुकवून त्यांनी आठ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी चोरली. याप्रकरणी सहकारनगर पोलिसात गुन्हा दाखल होता. पोलिसांनी यातील दोन्ही मुलींचा शोध घेऊन त्यांना अटक केली आहे. 

या प्रकरणी अधिक माहिती, काही दिवसांपूर्वी दोन तरुणी सराफा दुकानात दागिने खरेदी करण्यासाठी आल्या होत्या. खरेदी करत असताना त्यांनी सोन्याची अंगठी दाखवण्याची मागणी केली. त्यानंतर त्यांनी हातचलाखीने अंगठी गायब केली आणि दोघीही निघून गेल्या. दरम्यान अंगठी गायब असल्याचे दुकान मालकाच्या लक्षात आल्यानंतर त्याने सीसीटीव्ही तपासले असता या दोन तरुणी चोरी करताना दिसल्या. त्यानंतर त्यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

सहकारनगर पोलिसांनी परिसरातील 75 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले आणि या मुलींचा शोध लावला. या दोन्ही मुली नांदेडच्या असून शिक्षणासाठी त्या पुण्यात आल्या होत्या. आंबेगाव पठार परिसरात त्या राहत होत्या. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून आठ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी आणि दुचाकी असा 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.