Talegaon Crime News : एकाच दुचाकीचे तीनवेळा बिलिंग; 26 लाखांच्या फसवणूक प्रकरणी शोरूम मॅनेजरवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – एकाच दुचाकीचे दोन ते तीन वेळा बिलिंग करून आरटीओच्या पावत्यांमध्ये खाडाखोड करून खोटे नंबर वाहनांवर टाकून वाहनांची परस्पर विक्री करून एका शोरूम मॅनेजरने तब्बल 26 लाख 59 हजारांची माया जमवली. याप्रकरणी शोरूम मॅनेजरच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 31 मार्च 2017 ते 16 ऑगस्ट 2021 या कालावधीत खांडगे ऑटोमोबाईल, तळेगाव दाभाडे येथे घडला.

सिद्धार्थ सतीश दळवी (वय 30, रा. विद्याविहार कॉलनी, तळेगाव दाभाडे) असे गुन्हा दाखल झालेल्या शोरूम मॅनेजरचे नाव आहे. याप्रकरणी गणेश वसंतराव खांडगे (वय 50, रा. तळेगाव दाभाडे) यांनी गुरुवारी (दि. 23) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे तळेगाव दाभाडे येथे खांडगे ऑटोमोबाईल नावाचे दुचाकी वाहनांचे शोरूम आहे. आरोपी सिद्धार्थ हा त्या शोरूम मध्ये मागील काही वर्षांपासून मॅनेजर म्हणून काम करत होता. फिर्यादी खांडगे यांनी शोरूमचे सर्व व्यवहार आणि इतर बाबी विश्वासाने सिद्धार्थवर सोपवल्या होत्या.

सिद्धार्थ याने एकाच दुचाकी वाहनाचे दोन ते तीन वेळा बिलिंग करून आरटीओच्या रजिस्ट्रेशनच्या पावत्यांमध्ये खाडाखोड केली. त्यावर खोटे व चुकीचे नंबर टाकून ते नंबर खरे असल्याचे ग्राहकांना भासवून दुचाकी वाहनांची परस्पर विक्री केली. त्याबदल्यास ग्राहकांकडून आणि सब डीलरकडून तब्बल 26 लाख 59 हजार 235 रुपये घेऊन फिर्यादी यांचा विश्वासघात केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.