Pune News : पोलिस अधिकाऱ्याकडून लग्नाच्या आमिषाने 25 वर्षीय तरुणीवर बलात्कार

एमपीसी न्यूज : पुणे पोलिस दलात कार्यरत असणाऱ्या एका पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका 25 वर्षीय तरुणीला लग्न करण्याचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. कोथरूड पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलीस उपनिरीक्षक प्रवीण नागेश जरदे (रा. शांतीबन सोसायटी कोथरूड) असे गुन्हा दाखल झालेल्या पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी कोथरूड परिसरातीलच एका 25 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. मे 2018 पासून हा प्रकार सुरू होता.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, प्रवीण जरदे हे यापूर्वी कोथरूड पोलिस ठाण्यात नेमणुकीस होते. त्यावेळी त्याची ओळख ब्युटीशियन असलेल्या फिर्यादी तरुणीसोबत झाली होती. त्यानंतर त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.

तरुणीने लग्नाबाबत विचारणा केली असता ‘मी पोलिस अधिकारी आहे, तुझे तुकडे तुकडे करून तुला संपवून टाकेल, कोणी माझे काही वाकडे करू शकत नाही, मी सर्व मॅनेज करेल’ असे म्हणून फिर्यादीला शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी देत हाताने मारहाण केली. कोथरुड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.