Lonavala News : साते गावाजवळ दिंडीमध्ये टेम्पो घुसल्याने अपघात; 26 वारकरी जखमी तर 2 महिला वारकऱ्यांचा मृत्यू

एमपीसी न्यूज : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर मावळ तालुक्यातील साते गावाजवळ आज पहाटे सव्वासहाच्या सुमारास आळंदीकडे पायी जाणार्‍या दिंडीमध्ये भरधाव वेगाने येणारा पिकअप टेम्पो घुसल्याने भीषण अपघात झाला. या  भीषण अपघातात 26 वारकरी जखमी झाले असून 2 वारकरी महिला दगावल्या आहेत.

मृतांमध्ये जयश्री आत्माराम पवार (वय 55), आणि कुसुम वाळकु यरम (वय  55 ) या महिला वारकऱ्यांचा समावेश आहे.

आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यासाठी माउली कृपा चॅरिटेबल ट्रस्ट, उंबरे (ता. खालापूर) येथील तब्बल 200 वारकरी पायी आळंदीच्या दिशेने चालले होते. नायगाव येथील गुरुदत्त मंगल कार्यालयात काल रात्री मुक्काम होता. पहाटे साडेपाचच्या सुमारास पालखीने आळंदीकडे प्रस्थान ठेवले. सकाळी सव्वासहाच्या सुमारास दिंडी सारे फाट्याजवळ अतिथी हॉटेलसमोर आली असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेला पिकअप टेम्पो या पायी चालणाऱ्या वारीमध्ये घुसल्याने भीषण अपघात झाला.

यामध्ये 26 वारकरी जखमी तर 2 वारकऱ्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर अली आहे.  जखमींपैकी 14 जणांवर कामशेत येथील डॉ. विकेश मुथा यांच्या महावीर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे.

सहा रुग्णांना कामशेतच्या बढे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सोमाटणे फाटा येथील पवना हॉस्पिटल आणि कान्हे येथील ग्रामीण शासकीय रुग्णालयांत काही जखमींवर उपचार करण्यात येत आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटना स्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने रुग्णालयांत दाखल करण्यात आल्याची माहिती वडगावचे पोलीस निरीक्षक विलास भोसले यांनी दिली.

घटनास्थळी जखमी वारकऱ्यांच्या चपलांचा खच पडला होता. आळंदी यात्रेच्या पार्श्वभूमीवर ही दुर्घटना घडल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.