Pcmc Election 2022 : ओबीसींसाठी 37 जागा राखीव; उद्या चिंचवडमध्ये आरक्षण सोडत

एमपीसी न्यूज – आगामी पिंपरी – चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग (बीसीसी/ ओबीसीं)करिता 37 जागा राखीव राहणार आहेत. त्यातील 19 जागा महिलांसाठी असणार आहेत. तर, सर्वसाधारण गटासाठी 77 जागा असून त्यात महिलांसाठी 38 जागा आरक्षित असणार आहेत. त्यासाठी आरक्षित जागांची सोडत उद्या (शुक्रवारी) सकाळी 11 वाजता काढली जाणार आहे. इच्छुकांचे आरक्षण सोडतीकडे लक्ष लागले आहे. दरम्यान,एससीच्या 22 आणि एसटीच्या 3 जागांची सोडत कायम राहणार आहे. त्यात कोणताही बदल होणार नाही.

 

पिंपरी-चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक तीन सदस्यीय पद्धतीने होणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी 46 प्रभाग आहेत. तर, नगरसेवकसंख्या 139 जागा असून यामध्ये 70 महिला आणि 69 पुरूषांसाठी जागा राखीव आहेत. त्यात अनुसूचित जाती (एससी) 11 पुरुष 11 महिला अशा 22, अनुसूचित जमाती (एसटी) 2 महिला 1 पुरुष अशा 3, नागरिकांचा मागास प्रवर्ग (बीसीसी, ओबीसाठी) 19 महिला 18 पुरुष अशा 37 आणि खुल्या गटासाठी 38 महिला 39 पुरुष अशा 77 जागा अशी वर्गवारी आहे.

 

Lonavala News : लोणावळा शहरात ओबीसीच्या चार जागा कमी झाल्याने नाराजी

 

 

 

महापालिकेने 31 मे रोजी ओबीसी आरक्षणाविना सोडत काढली होती. एससी, एसटी महिला आणि सर्वसाधारण (महिला) यांच्याकरिता सोडत काढण्यात आली होती. दरम्यान, 20 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण दिले. त्यामुळे सर्वसाधारण आरक्षण सोडत रद्द झाली आहे. सर्वसाधारण 114 जागांसाठी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात येत्या शुक्रवारी सकाळी 11 वाजता आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. ए-फोर साईजच्या को-या कागदावरुन आरक्षणाच्या चिठ्ठया तयार केल्या जातील.  एका रंगाच्या रबरने त्या गुंडाळल्या जातील. गोल डब्यामध्ये टाकून फिरविल्यानंतर शाळेतील मुलांच्या हस्ते आरक्षणाच्या चिठ्या काढल्या जातील.

सुरुवातीला ओबीसींच्या 37 राखीव जागांसाठी सोडत काढली जाईल. त्यानंतर या 37 जागांमधून महिलांसाठीच्या राखीव 19 जागांसाठी सोडत काढण्यात येईल. शेवटी सर्वसाधारण महिलांसाठीच्या 38 जागांची सोडत काढली जाईल. सर्वसाधारण पुरुषांसाठी 39 जागा असणार आहेत. दरम्यान, इच्छुकांचे सोडतीकडे लक्ष लागले आहे. आरक्षणाची सोडत निघाल्यानंतर कोण सुपात आणि कोण जात्यात, हे स्पष्ट होणार आहे. अनेक माजी नगरसेवकांना याबाबतची चिंता लागून राहिली आहे. त्यामुळे आरक्षण सोडतीनंतर काही नगरसेवकांना अन्य प्रभागांत संधी शोधावी लागेल अथवा कुटुंबातील महिलेला संधी द्यावी लागणार आहे.

 

CM Ekanath Shinde : एकानाथ शिंदे यांचा मोर्चा आता ज्येष्ठ नेत्यांकडे; लिलाधर डाके यांची घेतली भेट

 

 

 

 

एससी, एसटीचे आरक्षण कायम!

एसीसी, एसटीचे आरक्षण कायम राहणार आहे. त्यात कोणताही बदल होणार नाही. अनुसूचित जातीसाठी (एससी) 22 जागा राखीव आहेत. त्यात  19, 41, 20, 18, 37, 43, 34, 24, 35, 11, 14  या प्रभागात महिलांसाठी 11 जागा राखीव झाल्या आहेत. तर, 2, 16, 17, 18, 22, 25, 29, 32, 37, 38, 39, 44, 46 या 11 जागा एससी पुरुषासांठी राखीव आहेत. तर, अनुसूचित जमाती (एसटी) महिलांसाठी  44, 41 राखीव झाली आहे. तर, प्रभाग क्रमांक 6 एसटी समाजातील पुरुषासाठी राखीव झालेला आहे.

ओबीसी नव्हे बीसीसी!
भारतीय राज्य घटनेमध्ये ‘ओबीसी’ असा शब्द नसून तो ‘बीसीसी’ असा आहे. नागरिकांचा मागास प्रवर्ग (बीसीसी) असे घटनेनुसार अभिप्रेत आहे. वाचकांच्या आकलनासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग (बीसीसी) यासाठी ‘ओबीसी’ हा शब्दप्रयोग वापरला जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.