Chinchwad : भरदिवसा घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
एमपीसी न्यूज – भरदिवसा घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी घरातून एक लाख 16 हजार 204 रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. ही घटना 27 डिसेंबर 2019 रोजी दुपारी साडेबारा ते अडीच या कालावधीत गणेश नगर चिंचवड येथे घडली. याप्रकरणी दोन आठवड्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक काशिनाथ चव्हाण (वय 62, रा गणेश नगर चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 डिसेंबर रोजी दुपारी साडेबारा ते अडीच या कालावधीत फिर्यादी अशोक यांचे घर कुलूप लावून बंद होते. अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कोयंडा तोडून घरात प्रवेश केला.
घरातील लोखंडी व लाकडी कपाटातील एक लाख 16 हजार 204 रुपये किमतीचे सोन्याचे आणि चांदीचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी बुधवारी 15 जानेवारी फिर्याद दिल्याने तब्बल दोन आठवड्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.