Pimpri: धक्कादायक! आज एकाच दिवशी मृतांमध्ये 17 रुग्णांची वाढ

Pimpri-Chinchwad: An increase of 17 patients death in the same day today डॅशबोर्डवर दिवसभरातील माहिती दिसते. आज मृत्यूची माहिती अपडेट झाली आहे. त्यामुळे आज एकाचदिवशी मृत्यूची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे.

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होताना दिसत आहे. शहरातील 14 आणि शहराबाहेरील 3 अशा 17 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आज (सोमवारी) पालिकेच्या डॅशबोर्डवर झाली आहे. आजपर्यंत शहरातील 121 आणि शहराबाहेरील 42 अशा एकूण 163 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. दरम्यान, काही खासगी रुग्णालयातील मृत्यूची माहिती उशिरा प्राप्त झाली. त्यामुळे आज एकाच दिवशी मृत्यूची संख्या वाढल्याचे दिसून येत असल्याचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी सांगितले.

शहरात 10 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. मागील काही दिवसांपासून रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. आजपर्यंत शहरातील 7368 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. बाधितांमध्ये युवकांचे प्रमाण सर्वाधिक आहे. 4406 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

तर, 2841 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. शहरातील कोरोनाचा पहिला बळी 12 एप्रिल रोजी गेला होता. थेरगाव भागातील एका पुरुषाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आजपर्यंत शहरातील 121 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

आज आत्तापर्यंत शहरातील 14 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. शहरातील कोरोनाच्या एकूण रुग्ण संख्येच्या तुलनेत मृत्यूचा आकडा अवघा दीड ते पावणेदोन टक्के असला. तरी, मागील काही दिवसांपासून मृत्यूमध्ये वाढ होऊ लागली आहे.

दिवसाला सात ते आठ जणांचा मृत्यू होत आहे. मृतांमध्ये चाळीशीच्या दरम्यानच्या रुग्णांचाही समावेश दिसून येत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. वयोवृद्ध आणि कोरोनासह विविध गंभीर आजार असलेल्यांचे प्रमाण जास्त आहे.

महापालिकेने रविवारी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार शहरातील 107 जणांचा तर शहराबाहेरील परंतु, महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 39 अशा 146 जणांचा कालपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला होता.

आज पालिकेच्या ‘डॅशबोर्ड’वर आजपर्यंत शहरातील 121 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. आज 14 जणांचा मृत्यू झाल्याची वाढ झाली आहे. तर, शहराबाहेरील पण पालिका रुग्णालयात उपचार घेणा-या 42 जणांचा मृत्यू झाल्याचे अपडेट आहे. त्यामुळे एकूण मृतांमध्ये आज एकाचदिवशी 17 जणांची भर पडली आहे.

एकाचदिवशी मृतांमध्ये एवढी वाढ झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. इतर शहरांच्या तुलनेत पिंपरी-चिंचवडचा मृत्यूदर सर्वांत कमी आहे.

याबाबत अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील म्हणाले, शहरातील कोरोना बाधित रुग्णांवर महापालिकेस विविध खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शहरातील काही रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात देखील उपचार सुरु आहेत. रुग्णाच्या मृत्यूची माहिती येण्यास विलंब होतो.

डॅशबोर्डवर दिवसभरातील माहिती दिसते. आज मृत्यूची माहिती अपडेट झाली आहे. त्यामुळे आज एकाचदिवशी मृत्यूची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.