Pune News : बुधवार पेठेत दोन खून ! तडीपार गुंडाकडून पोलिस कर्मचार्याचा खून तर देहविक्री करणाऱ्या महिलेचा अज्ञाताकडून खून
एमपीसी न्यूज : बुधवारी मध्यरात्री पुणे शहरातील फरासखाना पोलिस स्टेशनच्या हद्दीत दोन खून झाल्याचे उघडकीस आले आहे. तडीपार गुंड प्रवीण महाजन याने पोलीस कर्मचारी समीर सय्यद (वय 45) यांचा तीक्ष्ण हत्याराने वार करून निर्घृण खून केला आहे.
खून झाल्यानंतर घटनास्थळी दाखल झाल्या पोलिसांनी प्रवीण महाजन याला ताब्यात घेतले. तरीही कारवाई सुरू असतानाच बुधवार पेठेत आणखी एका देहविक्री करणाऱ्या महिलेचा खून झाल्याचे उघड झाले आहे. पोलीस स्टेशन पासून काही अंतरावर या घटना घडल्याने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, बुधवार पेठेतील श्री कृष्णा टॉकीज जवळ तडीपार गुंड प्रवीण महाजन यांनी पोलीस हवालदार समीर सय्यद (वय 48) यांचा निर्घृण खून केला. मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. हा खून नेमका का आणि कशामुळे केला हे मात्र अद्याप निष्पन्न झाले नाही. प्रवीण महाजन हा सराईत गुन्हेगार आहे. गुन्हेगारी स्वरूपाच्या पार्श्वभूमीवर त्याला मागील वर्षी पुणे शहर आणि जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार देखील करण्यात आले होते. या आदेशाचा भंग करीत त्याने शर्यतीवर अशाप्रकारे खून केलाय.
अशाप्रकारे खून झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावरून त्यांनी प्रवीण महाजन याला ताब्यात घेतले. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच तेथूनच काही अंतरावर आणखी एका महिलेचा खून झाल्याचे समजले. देह विक्री करणाऱ्या एका महिलेचा अज्ञात व्यक्तीने खून केला होता. शहरात लॉकडाऊन असताना, रात्री संचारबंदी असताना अशाप्रकारे दोन खून झाल्याने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेचा तपास फरासखाना पोलीस करत आहेत.