Corona Update : रोग प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या पदार्थांची यादी केंद्र सरकार कडून जाहीर, हे पदार्थ खा आणि कोरोनाला दूर ठेवा

एमपीसी न्यूज : कोरोना काळात रोगप्रतिकारशक्तीच आपल्या कामी येणार म्हणून निरनिराळे फंडे अजमावून पाहिले जात आहेत. हळद टाकलेले गरम दूध पिण्याकडे आणि च्यवनप्राश खाण्याकडे लोकांचे मन पुन्हा वळले आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती मजबूत व्हावी यासाठी पोषक आहार घेण्याकडे जनतेचा कल वाढला आहे. आता तर थेट केंद्र सरकारनेच नैसर्गिक प्रकारे आपली रोगप्रतिकारशक्ती घरच्या घरी कशी वाढवावी, अशा पौष्टिक पदार्थांची यादीच जाहीर केली आहे.

कोविड साथीत पोषक आहार घेण्याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. केंद्र सरकारनेही आता काही पदार्थांची यादी आपल्या ‘mygovindia’ ट्विटर हँडलवर दिली आहे. योग्य आरोग्यदायी पदार्थ योग्य प्रमाणात खाणे आवश्यक मानले जात आहे. कोविड झाल्यानंतरही पेशंटना लवकरात लवकर ताकद यावी, त्यांचे स्नायू बळकट व्हावेत, त्यांची प्रतिकारशक्ती वाढावी आणि त्यांना उत्साही वाटावे यासाठी योग्य प्रमाणात प्रोटीनयुक्त आहार दिला जात आहे. शारीरिकदृष्टय़ा तंदुरुस्ती वाढण्यासाठी नियमित व्यायाम करणे, असे उपाय सरकारने सुचविले आहेत.

या अन्नपदार्थांचा आहारात समावेश कराच…

बहुतांशी कोरोना पेशंटची आजारात वास व चव जाते, तसेच अन्न गिळताना त्रास होतो, त्यावेळी त्यांना सहज चावता येईल असे नरम पदार्थ थोडय़ा थोडय़ा अंतराने द्यावेत व त्यात आमचूर पावडर टाकावी.
शरीराला आवश्यक विटामिन्स व खनिजे मिळण्यासाठी पाच रंगित फळे आणि भाज्यांचा आहारात समावेश करावा.

नैराश्य, चिंता दूर करण्यासाठी सत्तर टक्के कोका पावडर असलेले डार्क चॉकलेट थोडय़ा प्रमाणात खावे.
प्रोटीन वाढीसाठी चिकन, मासे, अंडी, सोया, शेंगदाणे आणि कडधान्ये यांचा समावेश आहारात करावा.
नियमित व्यायाम करावा, योगा करावा, श्वसनाचा व्यायाम (प्राणायम) झेपेल तसा करावा.
आरोग्यदायी स्निग्धपदार्थात अक्रोड, ऑलिव्ई ऑईल आणि राईच्या तेलाचा आहारात समावेश करावा.
ज्वारी, ओट्स आणि राजगिरासारख्या धान्याचा आहारात समावेश करावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.