Pimpri News: “हॅलो पिंपरी- चिंचवड.. एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह”

महापालिका राबविणार उपक्रम; शिवप्रसाद महाले नागरिकांसोबत वेबिनारद्वारे साधणार संवाद

एमपीसी न्यूज – सध्या देशभरासह पिंपरी-चिंचवड शहरात कोविड-19 चा प्रादुर्भाव ओसरताना दिसत आहे. परंतु, तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यापार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करणे आवश्यक आहे. शहरातील नागरिकांच्या मनात कोरोनाविषयी असलेली मानसीक समस्या दूर करण्यासाठी महापालिका  “हॅलो पिंपरी-चिंचवड.. एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह” हा उपक्रम राबविणार आहे. शिवप्रसाद महाले हे नागरिकांसोबत दररोज वेबिनारद्वारे कोरोना संबंधित गैरसमज दूर करण्यासाठी संवाद साधणार आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) सुध्दा सहा आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याचे संकेत दिलेले आहेत. त्यामुळे सध्या कोविड बाधीत असलेल्या व ज्यांना अद्याप हा आजार झाला नाही अशासह सर्वच वर्गातील नागरिकांच्या मनात भीतीचे व चिंतेचे वातावरण असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नागरिकांमधील भीती दूर करण्यासाठी त्यांच्यामध्ये जागरुकता निर्माण करणे आवश्यक आहे. त्यासाठी “हॅलो पिंपरी चिंचवड.. एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह” हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

यापूर्वी शिवप्रसाद महाले यांनी महापालिकेच्या वायसीएम रुग्णालय, ऑटो क्लस्टर व जम्बो रुग्णालयात “रिचार्ज टु डिस्चार्ज” उपक्रम राबविला आहे. या उपक्रमातून ब-याच रुग्णांना दिलासा मिळल्याचे दिसून आले आहे. त्याच धर्तीवर शहरातील नागरिकांच्या मानसिक अडचणी दूर करणे, त्यांचे मनोधैर्य वाढविणे, काळजी घेण्याच्या हेतूने महापालिकेच्या माध्यमातून “हॅलो पिंपरी चिंचवड.. एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह” हा उपक्रम राबविणार असून या उपक्रमाच्या माध्यमातून लोकांच्या मनात सध्याच्या वातावरणामुळे निर्माण झालेली भीती, मानसिक ताण-तणाव दूर होण्यास मदत होणार आहे.

सदर उपक्रम महापालिकेच्या वॉर रुम मधील कॉल सेंटरच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. वॉररुम मध्ये 8888006666 या हेल्पलाईनवर दररोज येणाऱ्या नागरिकांच्या फोनकॉल वरुन समस्यांविषयी माहिती घेऊन त्या माहितीचा संक्षिप्त आढावा घेऊन त्याद्वारे एक सेशन तयार करणेत येईल.

त्याच दिवशी रात्री 8 वाजता फोन कॉल करण्या-या नागरिकांशी वेबिनारद्वारे संवाद साधून त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात येईल.  शहरातील नागरिकांनी आपल्या मनात कोरोना विषयी ज्या शंका असतील त्याबाबत वरील हेल्पलाईवर एक कॉल करुन आपला प्रॉब्लेम सोडवावा, असे आवाहन महापौर उषा ढोरे व सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.