Mahavitaran News : महावितरणकडे पुरेशा प्रमाणात मीटर उपलब्ध

तब्बल 33 लाख नवीन मीटर खरेदीची प्रक्रिया सुरु

एमपीसी न्यूज – महावितरणकडे (Mahavitaran) नवीन वीजमीटरचा कोणताही तुटवडा नसून सद्य परिस्थितीत पुरेशा प्रमाणात मीटर उपलब्ध आहेत. मीटर उपलब्धतेसाठी महावितरणने केलेल्या तातडीच्या उपाययोजनांमुळे येत्या सप्टेंबर 2022 पर्यंत 15 लाख नवीन सिंगल फेज वीजमीटरच्या पुरवठ्याचा कार्यादेश देण्यात आला आहे. गेल्या एप्रिल अखेर 1 लाख 31 हजार 802 वीजमीटर क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उपलब्ध होते तर मे महिन्यापासून आतापर्यंत आणखी 02 लाख 50 हजार नवीन मीटरचा पुरवठा करण्यात आला आहे. सोबतच कार्यादेश दिलेल्या 75 हजार नवीन थ्री फेजच्या मीटरचा पुरवठा देखील सुरु झाला आहे. त्यामुळे नवीन वीजजोडणी किंवा नादुरुस्त मीटर बदलण्यासाठी कार्यालयांमध्ये पुरेशा प्रमाणात वीजमीटर उपलब्ध आहेत असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, काही माध्यमातून वीजमीटरचा तुटवडा आहे असा संभ्रम वीजग्राहकांमध्ये निर्माण केला जात आहे. हे अतिशय चुकीचे असून वीजग्राहकांनी त्यावर विश्वास ठेऊ नये. नवीन वीजजोडणी व नादुरुस्त मीटर बदलण्यासाठी कार्यालयांकडून मीटर उपलब्ध होत नसल्यास महावितरणचे (Mahavitaran) संबंधित कार्यकारी अभियंता किंवा अधीक्षक अभियंता यांच्याशी ग्राहकांनी थेट संपर्क साधावा. सोबतच पुरेशा प्रमाणात वीजमीटर उपलब्ध असल्याने वीजग्राहकांना बाजारातून मीटर खरेदी करण्याची आवश्यकता नाही असेही महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

गेल्या दोन वर्षांतील कोरोनाच्या संसर्ग काळामध्ये विविध कंपन्यांकडून वीजमीटरचे उत्पादन थंडावले होते. यावर्षाच्या सुरवातीपासून मीटर उत्पादनाला नियमित सुरवात झाली आहे. या प्रतिकूल परिस्थितीमुळे महावितरणकडून नवीन वीजमीटरच्या उपलब्धतेमध्ये गतीने वाढ करण्यासाठी तात्काळ उपाययोजना सुरु करण्यात आली. यामध्ये निविदाअंतर्गत पुरवठादारांना तब्बल 15 लाख नवीन वीजमीटरच्या पुरवठ्याचा कार्यादेश गेल्या एप्रिल महिन्यात देण्यात आला आहे. त्यातून एप्रिलपासून आतापर्यंत 2 लाख 60 हजारांवर मीटर उपलब्ध झाले आहेत.

Rohit Sharma Tests Covid Positive : कर्णधार रोहित शर्मा कोरोनाच्या विळख्यात; कसोटी सामन्यात टीम इंडियासमोर वाढले आव्हान

याशिवाय येत्या जुलै, ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये प्रत्येकी 3 लाख 25 हजार नवीन वीजमीटर उपलब्ध होणार आहेत. सोबतच कार्यादेशाप्रमाणे 75 हजार नवीन थ्रीफेजच्या मीटरचा पुरवठा सुरु झाला आहे. महावितरणकडून सिंगल फेजच्या 12 लाख 80 हजार नवीन स्मार्ट मीटरच्या खरेदीसाठी निविदा प्रक्रिया सुरु आहे. तर पुढील काळात मीटरची वाढती मागणी पाहता आणखी 20 लाख सिंगल फेज मीटर खरेदीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे तब्बल 32 लाख 80 हजार नवीन वीजमीटर लवकरच टप्प्याटप्प्याने उपलब्ध होणार आहेत.

नागपूर परिमंडलामध्ये दरमहा सरासरी 06 हजार नवीन वीजजोडण्या देण्यात येतात. त्या तुलनेत मे व जूनमध्ये दुपटीहून अधिक 15 हजार नवीन वीजमीटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तर या आठवड्यात आणखी 04 हजार वीजमीटरचा पुरवठा होणार आहे तसेच एप्रिल व मे महिन्यात 3562 ग्राहकांचे नादुरुस्त मीटर बदलून देण्यात आले आहे. आकडेवारीमधील थोड्याफार फरकाने हीच स्थिती महावितरणच्या इतर परिमंडलांमध्ये आहे. वीजमीटर नादुरुस्त होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे व मीटर नादुरुस्त झाल्यास ते बदलून देण्याची प्रक्रिया ही नियमितपणे सुरु असते. वीजमीटरचा तुटवडा असल्याच्या चुकीच्या माहितीवर ग्राहकांनी विश्वास ठेऊ नये. तर पुरेशा प्रमाणात वीजमीटर उपलब्ध असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.