Pune News : पत्नी आणि मुलासह घरात झोपलेल्या तरुणाला सराईत गुन्हेगाराकडून मारहाण

एमपीसी न्यूज : पत्नी आणि दोन मुलांसह घरात झोपलेल्या तरुणाला सराईत गुन्हेगार आणि त्याच्या साथीदारांनी रात्रीच्या वेळी घरात घुसून बेदम मारहाण केली. येरवड्यातील चंद्रमानगर झोपडपट्टी परिसरात हा प्रकार घडला. येरवडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. 

सचिन रावसाहेब तिजोरे (वय 29) आणि सागर रावसाहेब तिजोरे (वय 25) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील सचिन तिजोरे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. याप्रकरणी सुरेश किसन खरात (वय 38) यांनी फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, बुधवारी रात्रीच्या सुमारास फिर्यादी हे चंद्रमा नगर येथील आपल्या घरी रात्रीच्या वेळी झोपले होते. यावेळी आधी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून दोन्ही आरोपी फिर्यादीच्या घरात शिरले.

सागर तिजोरे याने “तू माझ्या भावाला नडला आहे, त्यामुळे मी आता तुला जिवंत ठेवणार नाही” असे म्हणून त्यांना ठार मारण्याच्या उद्देशाने डोकात, कपाळावर, पायावर आणि पाठीवर लाकडी दांडक्याने आणि स्टम्पने बेदम मारहाण केली. येरवडा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.