Pune News : जनरल इन्शुरन्स कंपनीचे बनावट इन्शुरन्स पॉलिसी पेपर वाहनधारकांना विकणारा आरोपी जेरबंद  

एमपीसी न्यूज – बजाज अलायन्झ या जनरल इन्शुरन्स कंपनीचे बनावट इन्शुरन्स पॉलिसी पेपर तयार करून वाहन मालकांना कमी पैशात विक्री करणा-या आरोपीला जेरबंद करण्यात आले आहे. गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक दोन यांनी बुधवारी (दि.01) येरवडा परिसरात ही कारवाई केली. संतोष विठ्ठल शिंदे (वय 47, रा. गांधीनगर, येरवडा, पुणे) असे अटक आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कंपनीच्या नावाचा लोगो व शिक्क्याचा वापर करुन, बनावट इन्शुरन्स पॉलिसी पेपर तयार करत होता. व येरवडा व लोहगांव भागात ते बनावट पॉलिसीचे पेपर पियाजो, बजाज ऑटो रिक्षा, टुरिस्ट कार, टेम्पो व ट्रक अशा वाहनांचे मालकांना कमी पैशात विक्री करत होता. अशा एका बनावट पॉलीसीचा तपास केला असता कंपनीच्या अधिका-यांनी ही पॉलीसी बनावट असल्याचे सांगितले. दरम्यान. याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला असता, आरोपी बनावट पॉलीसी घेऊन येरवडा परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी या परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

त्याच्याजवळ 6 लाख 32 हजार 942 रूपयांचे 34 बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स पॉलिसी बनावट पेपर मिळाले. आरोपीच्या घरातून इन्शुरन्स पॉलिसी पेपर तयार करण्यासाठी वापरात येणारा लॅपटॉप, प्रिंन्टर, शिक्के, स्टॅम्प पॅड व कोरी कागदे असे 35 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

आरोपीवर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलीस रिमांडमध्ये घेण्यात आले आहे. या गुन्ह्यातील इतर संबधित आरोपींचा तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.