Nigdi News : आयपीएल क्रिकेट सामन्यावर ऑनलाइन सट्टा लावणार्‍यांवर कारवाईसाठी गेलेल्या गुंडाविरोधी पथकातील पोलिसांना मारहाण

तिघांना अटक

एमपीसी न्यूज – आयपीएल क्रिकेट सामन्यावर ऑनलाइन माध्यमातून सट्टा लावणार्‍यांवर कारवाईसाठी गेलेल्या गुंडा विरोधी पथकातील पोलिसांना मारहाण झाल्याची घटना शुक्रवारी (दि. 16) रात्री आकुर्डी परिसरात घडली. याबाबत चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करत तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

श्रीपाद मोहन यादव (वय 22, रा. पंचतारानगर, आकुर्डी), अमित रामपाल अगरवाल (वय 35, रा. निगडी), नितीश रामदास काळे (वय 21, रा. पंचतारानगर, आकुर्डी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह किशोर रेहाल उर्फ किशोर भाई रा. चेंबूर मुंबई याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस नाईक विजय तेलेवार यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शाखेच्या गुंडा विरोधी पथकाला माहिती मिळाली की, आकुर्डी परिसरात काही व्यक्ती पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या आयपीएल क्रिकेट सामन्यांवर लोटस ऑनलाइन सट्टा हा जुगार खेळत आणि खेळवत आहेत.

त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा लावून कारवाई  केली. त्यावेळी आरोपी ऑनलाइन सट्टा घेत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी आरोपींवर कारवाई केली. त्यावेळी आरोपींनी पोलिसांना धक्काबुक्की करत गडबड गोंधळ आणि दहशतीचे वातावरण तयार केले पोलिसांना मारहाण करून पोलिसांच्या सरकारी कामात आरोपींनी अडथळा निर्माण केला. याबाबत तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.