Bhosari News: मोबाईल शोरूम फोडून लाखोंचे मोबाईल पळवणा-या बंगाली टोळीला अटक

एमपीसी न्यूज – भोसरी येथील एम आर सूर्य इलेक्ट्रॉनिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि समर्थ मोबाईलचे भव्य शोरूम फोडून चोरट्यांनी 61 लाख रुपये किमतीचे 244 मोबाईल फोन चोरून नेल्याची घटना घटना 4 जानेवारी रोजी उघडकीस आली. ही घरफोडी पश्चिम बंगाल येथील आरोपींनी केली असून त्यात पश्चिम बंगाल येथील तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

जानीबुलहक मामुलत अली (वय 33), जब्बार कुतुब अली (वय 21), जहांगीरअलम मामुदी शेख (वय 32, तिघे रा. ठाणे, मूळ रा. पश्चिम बंगाल) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आलम मोंटू शेख (रा. झारखंड), नूरइस्लाम उर्फ जंजाली मामुलत अली (रा. पुणे), अल्लाउद्दीन मामुलत अली (रा. ठाणे वेस्ट. सर्व मूळ रा. पश्चिम बंगाल) हे तिघेजण सध्या फरार आहेत. प्रभू रतनलाल भाटी (वय 32, रा. नेवाळेवस्ती, चिखली) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी भाटी यांचे भोसरी येथे एम आर सूर्या इलेक्ट्रॉनिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नावाचे मोबाईलचे शोरूम आहे. तीन जानेवारी रोजी रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारास त्यांनी शोरूम कुलूप लावून बंद केले. रात्रीच्या वेळी चोरट्यांनी शोरुमच्या छताचा पत्रा उचकटून आत प्रवेश केला. शोरूममधून तब्बल 61 लाख रुपये किमतीचे 244 मोबाईल फोन चोरून नेले. फिर्यादी चार जानेवारी रोजी सकाळी दुकान उघडण्यासाठी आले असता हा प्रकार उघडकीस आला. तसेच त्यानंतर समर्थ मोबाईल शॉपी हे दुकान फोडल्याची घटना घडली.

दोन्ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी परिसरातील 125 सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेत आरोपी निष्पन्न केले. त्यांचा माग काढून भोसरी पोलिसांनी हिरानंदानी घोडबंदर रोड ठाणे येथून तिघांना अटक केली. त्यांनी त्यांच्या अन्य तीन साथीदारांसोबत मिळून हे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून 59 लाख 16 हजार 50 रुपये किमतीचे 213 मोबाईल फोन आणि एक एलईडी टीव्ही हस्तगत करण्यात आला आहे.

आरोपी ठाणे येथील एका बांधकाम साईटवर दिवसभर काम करत. रात्री पुणे परिसरात येऊन नविन मोबाईलच्या दुकानाची रेकी करून रात्री चोरी करून पुन्हा ठाणे येथे जाऊन काम करत. त्यामुळे त्यांचा कोणाला संशय येत नसे. हे आरोपी सराईत असून झारखंड व पश्चिम बंगाल येथून महाराष्ट्र व इतर राज्यामध्ये जाऊन फक्त मोबाईलची दुकाने फोडत. चोरीचे मोबाईल बांगलादेशामध्ये विकत. त्यामुळे सदरचे मोबाईल तांत्रीक दृष्ट्या ट्रेस होत नाहीत. परंतु भोसरी पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यामध्ये भोसरी पोलीसांनी वेगवान तपास करून आरोपींना तात्काळ अटक केली. त्यामुळे ते मोबाईल फोन विकू शकले नाहीत.

आरोपी मोंटू हा पश्चिम बंगाल मध्ये सराईत गुन्हेगार आहे. त्याचा एकदा पश्चिम बंगाल पोलिसांनी पाठलाग केला. त्यावेळी त्याने गंगा नदीत उडी मारली. पोलिसांनी बोटीने त्याचा पाठलाग केला मात्र तो पोलिसांना चुकवून गंगा नदी पार करून पळून गेला.

ही कामगिरी पोलीस कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त इंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र कदम, पोलीस निरीक्षक (प्रशासन) नितीन लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रविंद्र भवारी, पोलीस अंमलदार हेमंत खरात, मच्छींद्र बांबळे, राजू जाधव, धोंडीराम केंद्रे, संतोष महाडीक, प्रभाकर खाडे, तुषार वराडे, स्वामी नरवडे, सुषमा पाटील यांनी केली आहे. या कामगिरी बद्दल या तपास पथकाला पोलीस आयुक्तांनी 50 हजारांचा पुरस्कार जाहीर केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.