Bhosari : चिखली, भोसरी, वाकड परिसरातून पाच दुचाकी पळविल्या

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात वाहन चोरीचे सत्र थांबता थांबत नाही. भोसरी, चिखली आणि वाकड परिसरातून सुमारे 1 लाख 15 हजार रुपये किमतीच्या आणखी पाच दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत. याप्रकरणी गुरुवारी (दि. 12) संबधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

भोसरी पोलीस ठाण्यात तीन वाहन चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये संजयकुमार चंद्रेश्वर सिंग (वय 34, रा. ट्रान्सपोर्ट नगर, निगडी) यांनी प्रथम फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजयकुमार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 4 डिसेंबर रोजी दुपारी दोन ते तीन या कालावधीत त्यांची 15 हजार रुपये किमतीची एमएच 14/ सीटी 0968 ही दुचाकी खंडेवस्ती भोसरी एमआयडीसी येथील नाला पार्क येथे पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी ती चोरून नेली.

त्यानंतर, अमोल सहदेवराव अरडक (वय 39, रा. मोशी) यांनी अज्ञात चोरट्याविरोधात फिर्याद दिली आहे. अमोल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अमोल यांनी त्यांची 15 हजार रुपये किमतीची एमएच 14/ सीव्ही 8659 ही दुचाकी 19 नोव्हेंबर रोजी रात्री साडेदहा वाजता भोसरी-आळंदी रोडवरील सिद्धेश्वर पान शॉप समोर पार्क केली. अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेली. हा प्रकार 20 नोव्हेंबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास उघडकीस आला.

महावीर कोंडीबा साळवे (वय 45, रा. दापोडी) यांनी वाहन चोरीची तिसरी फिर्याद दिली. महावीर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 6 नोव्हेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास महावीर यांनी त्यांची 25 हजार रुपये किमतीची एम एच 14 / एच एल 2435 ही दुचाकी एस एम एस कॉलनी दापोडी येथे घरासमोर पार्क केली. अज्ञात चोरटयांनी दुचाकी चोरून नेली. 7 नोव्हेंबर रोजी पहाटे पाचच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. तिन्ही गुन्ह्यांचा तपास भोसरी पोलीस करीत आहेत.

लीलाधर यशवंत भारंबे (वय 49, रा. शरद नगर, चिंचवड) यांनी चिखली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात फिर्याद दिली आहे. लीलाधर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 8 डिसेंबर रोजी सायंकाळी पावणेआठच्या सुमारास लीलाधर यांनी त्यांची 30 हजार रुपये किमतीची एम एच 14 / जी बी 0064 डी दुचाकी घरासमोर पार्क केली. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. हा याप्रकारे 9 डिसेंबर रोजी सकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

अभिजित ज्ञानेश्वर चव्हाण (वय 22, रा. वाकड) यांनी अज्ञात चोरट्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अभिजित यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बुधवारी (दि. 11) पहाटे साडेबाराच्या सुमारास अभिजित यांनी त्यांची 30 हजार रुपये किमतीची एमएच 25 / ए सी 8130 दुचारी घरासमोर पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. हा प्रकार सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.