Hinjawadi News : कासारसाईमध्ये सव्वा दोन लाखांची घरफोडी

एमपीसी न्यूज – अज्ञात चोरट्यांनी वृंदावन कॉलनी, कासारसाई येथे घरफोडी करून दोन लाख 24 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना मंगळवारी (दि. 31) सकाळी उघडकीस आली.

सागर नामदेव पोटे (वय 30, रा. वृंदावन कॉलनी, कासारसाई) यांनी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी एका फार्मा कंपनीत हाऊस किपर म्हणून काम करतात. सोमवारी (दि. 30) रात्री 11 ते मंगळवारी सकाळी साडेसहा वाजताच्या कालावधीत फिर्यादी यांचे घर बंद होते. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. लोखंडी कापटाचे लॉक तोडून एक लाख 65 हजार रुपये रोख रक्कम आणि 59 हजार 500 रुपयांचे सोन्याचे दागिने असा एकूण दोन लाख 24 हजारांचा ऐवज चोरून नेला.

अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांच्या घरापासून काही अंतरावर राहणारे संजय रभाजी जरे आणि बबन साहेबराव भोसेकर (रा. कासारवाडी) यांच्याही घराचा कडी कोयंडा तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक खारगे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.