Chakan Crime News : चाकण, वाकड, चिखलीत दागिने हिसकावले; सांगवीत घरफोडी, चाकणमध्ये टायर पळवले

एमपीसी न्यूज – चाकण येथे एका दुचाकीस्वार व्यक्तीची सोनसाखळी तर वाकड, चिखलीमध्ये दोन महिलांचे दागिने चोरट्यांनी हिसकावले. सांगवी येथे घरफोडी झाली असून चाकण मध्ये आणखी एक चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. यात चोरट्यांनी वाहनाचे टायर चोरून नेले आहेत. याप्रकरणी सोमवारी (दि. 29) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

दत्तात्रय सखाराम साबळे (वय 51, रा. साबळेमळा, बहुळ, ता. खेड) हे दुचाकीवरून जात होते. त्यांना अनोळखी व्यक्तींनी हाक मारली. त्यामुळे साबळे यांनी त्यांच्या दुचाकीचा वेग कमी केला. त्यानंतर चोरट्यांनी साबळे यांच्या गळ्यातील 40 हजारांची सोनसाखळी जबरदस्तीने हिसकावून नेली. साबळे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

थेरगाव येथे दीपाली रोहिदास सौदागरे (वय 35, रा. पडवळनगर, थेरगाव) यांच्या गळ्यातील 81 हजार रुपये किमतीचे मिनी मंगळसूत्र एका चोरट्याने जबरदस्तीने हिसका मारून चोरून नेले. याप्रकरणी सौदागरे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आशा रमेश पवार (वय 55, रा. आकुर्डी) या त्यांच्या मुलीकडे आल्या होत्या. मुलीच्या घरासमोर फिरत असताना दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 30 हजार 400 रुपये किमतीचे सोन्याचे डोरले चोरून नेले. पवार यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

जुनी सांगवी येथे एका अज्ञात चोरट्याने घरफोडी करून 48 हजार 100 रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि कागदपत्रे चोरून नेली. पापिया दुलाल बच्चर (वय 34, रा. जुनी सांगवी) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

चाकण परिसरातील बालाजीनगर येथे एका पेट्रोल पंपाजवळ पार्क केलेल्या ट्रकचे एक लाख 20 हजार रुपये किमतीचे तीन डिस्कसहित टायर चोरून नेले. याप्रकरणी स्वप्नील पिराजी काकडे (वय 32, रा. भोसरी) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वरील चोरीच्या पाच घटनांमध्ये चोरट्यांनी तीन लाख 18 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.