Pimpri News : तक्रार निकाली न काढताच बंद; ‘सारथी’ हेल्पलाइनच बंद करा – प्रशांत राऊळ

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडकरासांठी वरदान ठरत असलेल्या सारथी हेल्पलाईनची परिणामकारता संपली आहे. अनेक तक्रारीवर कोणतेही समाधान कारक उत्तर किंवा उपाय मिळत नाही. तक्रार निकाली न काढताच बंद केल्या जातात. किंवा चुकीचे शेरे देऊन चालढकल करतात. त्याचबरोबर गेले अनेक महिने तक्रारींचे टोकन नंबर मिळत नाहीत. त्यामुळे डबघाईला गेलेली हेल्पलाइनच बंद करावी, अशी संतप्त मागणी करदाते नागरिक प्रशांत राऊळ यांनी केली.

याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात राऊळ यांनी म्हटले आहे की, महापालिकेच्या विविध विभागांकडील नागरी सेवा/सुविधांबाबतची माहिती नागरिकांना तत्काळ उपलब्ध होण्यासाठी अत्याधुनिक संगणकीकृत हेल्पलाईन (कॉल सेंटर) ही सुविधा तत्कालीन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या संकल्पनेतून 15 ऑगस्ट 2013 रोजी सुरू करण्यात आली आहे. ‘सारथी’ हेल्पलाईन दूरध्वनी सेवा 24 तास आठवड्यातील सातही दिवस नागरीकांसाठी उपलब्ध असून त्याद्वारे नागरिकांना आवश्यक असलेली माहिती फोनवरून उपलब्ध होते.

सारथी हेल्पलाईन, सामान्य नागरिकांना त्यांचे दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी उपयुक्त ठरते. त्यामध्ये तक्रार केल्यानंतर त्याचे टोकन येणे अतिशय महत्वाचे आहे. तक्रार कोणत्या टप्प्यात आहे, ती निकाली निघाली आहे का, याची माहिती टोकनवरून घेता येते. त्यामुळे टोकन मिळणे अतिशय महत्वाचे आहे. परंतु, मागील काही महिन्यांपासून टोकन मिळणे बंद झाले आहे.

महापालिका अधिकारी सारथीवर आलेल्या तक्रारी गांभीर्याने घेत नाहीत किंवा काम न करता तक्रारी बंद केल्या जातात.  चुकीचे शेरे देऊन चालढकल करतात.  तक्रारींचे टोकन नंबर मिळत नाहीत. स्मार्ट सिटी असताना सारथी कर्मचारी सिस्टीम स्लो आहे असे सांगत आहेत.  त्यामुळे टोकन न येणे तक्रारींचा संदर्भ व मागील आढावा घेता येत नाही असे सांगत आहेत. त्यामुळे अशी डबघाईला गेलेली व्यवस्था बंद करावी. नाहक करदात्यांच्या पैसा वाया घालवू नये किंवा त्याकडे लक्ष देऊन ती आधीचे कार्यक्षम आयुक्त श्रीकर परदेशी यांच्यासारखी सुरू ठेवावी.

दरम्यान, सारथी हेल्पलाईनचे टोकन मिळत नसल्याबाबत ‘एमपीसी न्यूज’ने वारंवार आवाज उठविला. प्रशासनाने टोकन दिले जाईल असे सांगितले. परंतु, अद्यापही तक्रारींचे टोकन मिळत नसल्याचा आरोप करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.