Mumbai News : कृषी कायदे मागे घेण्याच्या घोषणेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले….

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे मागे घेण्याची शोषणा केली, यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘कृषी कायदे मागे घेण्याची केलेली घोषणा म्हणजे सर्वसामान्य माणूस या देशात काय करू शकतो आणि त्याची ताकद काय असते याचे उदाहरण आहे’, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) विधेयक 2020, शेतकरी (सशक्तीकरण आणि संरक्षण) किंमत आश्वासन आणि कृषी सेवा करार विधेयक 2020 आणि अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) विधेयक 2020 हे तीन कायदे मागील वर्षी केंद्र सरकारने संमत केले होते. त्यानंतर हे कायदे शेतकरी विरोधी असल्याचे म्हणत अनेक शेतकरी संघटनांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. तब्बल एक वर्ष या संघटनांनी आंदोलन केले. शुक्रवारी (दि. 19) सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांशी संवाद साधला. त्यात त्यांनी हे तीनही कायदे मागे घेत असल्याची घोषणा केली.

याबाबत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ‘शेतकरी कायद्यांविरुद्ध देशभर विरोधाचं वातावरण होतं. आंदोलने सुरू होती आणि आजही सुरूच आहेत. आपल्या सर्वांचे पोट भरणाऱ्या अन्नदात्यांचे यात नाहक बळी गेले आहेत. पण या अन्नदात्याने आपली शक्ती दाखवून दिली, त्यांना माझं त्रिवार वंदन! जे वीर या आंदोलनात प्राणास मुकले त्यांना मी यानिमित्तानं नम्र अभिवादन करतो.

मुख्यमंत्री ठाकरे पुढे म्हणाले, आता सरकारला उपरती झाली आणि हे कायदे मागं घेण्याची घोषणा पंतप्रधानांनी गुरू नानक जयंतीच्या निमित्तानं केली, त्याचं मी प्रथम तर स्वागत करतो. महाविकास आघाडीनं या कृषी कायद्यांविरुद्ध आपली भूमिका असल्याचं वारंवार सांगितलं आहे. शिवाय मंत्रिमंडळात, विधिमंडळात देखील या कायद्याच्या दुष्परिणामावर चर्चा केली आहे. केंद्राने यापुढं असे कायदे आणण्यापूर्वी सर्व विरोधी पक्ष तसेच संबंधित संघटना यांना विश्वासात घेऊन संपूर्ण देशाच्या दृष्टीने हिताचा निर्णय घ्यायला हवे म्हणजे आज जी नामुष्की ओढवली आहे असं होणार नाही. हे कायदे मागे घेण्याची तांत्रिक प्रक्रियाही लवकरात लवकर होईल अशी माझी अपेक्षा आहे.

दरम्यान, तीनही कायदे मागे घेतल्याच्या पंतप्रधानांच्या घोषणेवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनही केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्याचा घेतलेला निर्णय शेतकरी एकजुटीचा, महात्मा गांधीजींनी दाखवलेल्या अहिंसा, सत्याग्रहाच्या मार्गाचा विजय आहे. योग्य निर्णयाबद्दल पंतप्रधान महोदयांचे आभार. शांततामय मार्गाने दिलेल्या प्रदीर्घ लढ्याबद्दल शेतकरी बांधवांचे अभिनंदन. शेतमालाला किमान आधारभूत दर देण्याचा कायदा केंद्र सरकारने करावा ही मागणीही लवकर मान्य व्हावी. लोकशाहीत लोकेच्छेचाच विजय होतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.’

माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी चंद्रपूरमधून पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. त्यांनी म्हटले आहे की, उत्तर प्रदेश आणि पंजाबच्या निवडणुकीमध्ये भाजपचे प्रतिनिधी गावात गेल्यावर शेतकरी त्यांना जाब विचारतील, हे लक्षात आल्यावर त्यांनी हा निर्णय घेतलाय. हे सरकारला उशीरा शहाणपण सुचलंय. चांगलंच आहे. शांततेच्या मार्गाने आपल्या प्रश्नासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना मी सलाम करतो, असंही पवार म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.