Pune News : शेतकऱ्यांच्या लढ्याचा विजय, मोदी यांच्या अहंकाराचा पराभव – मोहन जोशी

एमपीसी न्यूज – शेतकरीविरोधी कायदे मागे घ्यावे लागणे हा शेतकऱ्यांच्या शांततामय लढ्याचा विजय असून पंतप्रधान मोदी यांच्या अहंकाराचा पराभव आहे, अशी प्रतिक्रिया माजी आमदार आणि प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी दिली.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचाराने आणि त्यांच्या शांततामय मार्गाने देशातील शेतकऱ्यांनी मोदी सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात प्रदीर्घ आणि चिवटपणे लढा दिला. खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षानेही या लढ्याला संपूर्णपणे साथ दिली. महाराष्ट्रात बंद पुकारला. कृषी कायद्याविरोधात सह्यांची मोहीम राबविली. या बंदला आणि सह्यांच्या मोहीमेला शेतकऱ्यांनी आणि शहरातीलही अनेक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. अशा विविध मार्गाने शेतकऱ्यांची बाजू मांडल्याने जनतेचा रेटा निर्माण झाला आणि त्यापुढे केंद्र सरकारला झुकावे लागले आणि शेतकरीविरोधी कायदे लादू पाहाणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अहंकाराचा पराभव झाला, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

या आंदोलन काळात अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. त्या शेतकऱ्यांच्या बलिदानाचे आज स्मरण होते. शेतकऱ्यांची आंदोलने दडपण्यासाठी पोलीसबळाचा वापर करण्यात आला. भाजपचे केंद्रीय मंत्री मिश्रा यांच्या मुलाने आंदोलक शेतकऱ्यांवर गाडी घालून बळी घेतले. सरकारी यंत्रणा वापरुन चाललेल्या दडपणापुढे शेतकरी शांततेने आंदोलन करत राहिले. त्यांच्या लढ्याला अखेर यश आले. देशातील शेतकरी आंदोलनाच्या इतिहासात नोंद घ्यावी अशी ही घटना आहे, असे मोहन जोशी यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.