Nigdi News : पुरस्कारांसाठी आयुक्तांकडून गरीब फेरीवाल्यांवर कारवाई; फेरीवाल्यांचा आरोप

एमपीसी न्यूज – फोल ठरलेली स्मार्ट सिटी, स्वच्छ भारत अभियान, नागरिकांच्या पैशाची उधळपट्टी करुन अर्बनस्ट्रीटच्या नावाखाली पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वच प्रभागांमध्ये फेरीवाल्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू आहे. ही कारवाई अन्यायकारक असून एकेकाळी पाव विकणारे, भाजीपाला विकणारे आयुक्त यांच्याकडून फेरीवाल्यांबद्दल जाणीव, सद्भभावनापूर्वक कामाऐवजी मोठेपद आल्यावर अन्याय करुन गरिबांचा रोजगार हिरावून घेतला जातो. केवळ पुरस्कारासाठी आमच्या गोरगरिबांचा रोजगार हिरावून घेऊ नका, अन्यथा महापालिकेच्या दारात येऊन बसू, असा इशारा नॅशनल हॉकर फेडरेशन, कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे सर्व फेरीवाल्यांकडून देण्यात आला.

निगडी भक्ती-शक्ती येथे फेरीवाल्यांनी कामगारदिनी महापालिका कारवाई निषेधार्थ उपवास केला. कामगार नेते काशिनाथ नखाते, बिलाल तांबोळी, समाधान जावळे, अशोक ढगे, राहुल कुलकर्णी, बबलू सिंग ,शोभा दोरवे, मुन्ना मनियार, मलिका राजनाळ, रफिक शेख, सुलाबाई पगारे, रिना गायकवाड, नसरीन सेख, रेखा दुधभाते, संध्या कांबळे, संगीता वाघमारे, विजय लोखंडे, अशोक ढगे,आयवीन फर्नांडिस, बाळकृष्ण पवार,संतोष ढेरंगे, अनिल आदलिंगे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी नखाते म्हणाले की, महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी, राजीव जाधव , दिनेश वाघमारे यांनी फेरीवाल्यांच्या बाबतीत समाधानकारक काम केले. मात्र, आयुक्तपदी राजेश पाटील रुजू झाल्यापासून पथारी, हातगाडी, स्टॉल, धारक गोरगरीबांवर अन्यायकारक व बेकायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. महापालिकेने काढलेल्या बेकायदेशीर कारवाईच्या आदेशाच्या विरोधात आम्ही उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली असून न्यायालयाने परवाना धारकावर कारवाईस स्थगिती दिली आहे.

कायदेशीर प्रक्रिया न करता महापालिकेकडून बेकायदेशीर हॉकर झोन , बोगस सर्व्हे करून फेरीवाल्यांना दमदाटी केली जात आहे. हे चुकीचे असून पथ विक्रेता कायद्याच्या कलम 3 व 4 या कलमाचे उल्लंघन आयुक्तांकडून होत आहे. अशा प्रकारची जबरदस्ती आणि शहर फेरीवाला समिती व संघटनाला विश्वासात न घेता चुकिच्या जागा निवडल्याने महापालिकेच्या अनेक मंडया ओस पडल्या आहेत. महापालिकेला यापूर्वीही अनेक पुरस्कार मिळाले आहेत; मात्र हे आयुक्त पुरस्कारासाठी नेहमी अग्रेसर असतात. परंतु, पुरस्कारासाठी कोनाचा बळी जात असेल तर योग्य नाही. आता ही तिच स्थिती आहे फेरीवाल्यांनी नाकारलेल्या जागांचा हट्ट केला जात आहे. हे थांबवुन शहर फेरीवाला समितीच्या मान्यतेने कामकाज करावे अन्याथ संघर्ष करायला फेरीवाले तयार आहेत, असा इशारा नखाते यांनी दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.