Nawale Bridge Accident : कंटेनरचे डिझेल संपले अन् अपघात झाला, 3 निष्पाप नागरिकांना गमवावे लागले प्राण

एमपीसी न्यूज : मुंबई बंगळूर महामार्गावर आज सकाळी सात वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला. कामाला निघालेले, मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेले निष्पाप नागरिक या अपघातात ठार झाले. या अपघातप्रकरणी एक नवीन माहिती समोर आली आहे. डिझेल संपल्यामुळे रस्त्याच्या मधोमध बंद पडलेला कंटेनर नंतर डिझेल टाकून सुरू करत असताना ब्रेक फेल झाले आणि हा कंटेनर सत्तरच्या स्पीडने रिव्हर्स गेला आणि हा अपघात झाला.

आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा कंटेनर डीझेल संपल्यामुळे मुंबई बंगळूर महामार्गावरील नवले पुलाजवळ बंद पडला होता. त्यानंतर काही वेळाने ड्रायव्हरने डीजेल आणून कंटेनर पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला. परंतु यावेळी ब्रेक फेल झाले आणि हा कंटेनर ताशी 70 च्या वेगाने रिव्हर्स गेला.. मागे जाताना त्याने दोन ते तीन वाहनांना धडक दिली.. यामध्ये काही दुचाकींचा देखील समावेश आहे.. या कंटेनरखाली चिरडला गेल्यानं तिघा जणांचा जागीच मृत्यू झाला तर चार ते पाच जण जखमी झाले आहेत..

मुंबई बंगलोर महामार्गावरील नवले पुलाजवळील हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे.. 2014 पासून आतापर्यंत या परिसरात साठहून अधिक अपघात झाले आहेत.. तर आतापर्यंत येथील अपघातात 64 जणांचा मृत्यू झाला आहे. येथील रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, या महामार्गाची पुनर्रचना करण्यात यावी यासाठी स्थानिक नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या आहेत.

परंतु अद्याप यावर कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. प्रत्येक वेळी अपघात झाल्यानंतर येथील रस्त्याचा विषय चर्चिला जातो आणि काही दिवसानंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती होते.. लोकप्रतिनिधींनी आतातरी जागे होऊन मुंबई बंगळूर महामार्गावरील या रस्त्याविषयी ठोस उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे..

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.