Pune News : पालिकेच्या पोटे दवाखान्यात बसवण्यात येणाऱ्या सी. टी. स्कॅन यंत्रणा

एमपीसी न्यूज : महापालिकेच्या पद्मावती येथील शिवशकंर शंकर पोटे दवाखान्यात बसवण्यात येणाऱ्या सी. टी. स्कॅन यंत्रणेसाठी निधी वर्गीकरण करण्याचा प्रस्ताव अखेर स्थायी समितीने मंजूर केला आहे.

पालिकेच्या पोटे दवाखान्यात एमआरआय तसेच सी. टी. स्कॅन यंत्र बसविण्याचा प्रस्ताव मान्य करण्यात आला. त्यानुसार २०१७ मध्ये सुमारे साडेनऊ कोटींची मशीन बसविण्यात आली. त्यानंतर या ठिकाणी सी. टी. स्कॅन यंत्रही बसविणे प्रस्तावित होते. त्यासाठी सुमारे २ कोटी ३४ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित होता. मात्र, महापालिकेत सत्ताबदल झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी मशीनसाठी तुटपुंजा निधी दिला. त्यामुळे २०२१-२२ या आर्थिक वर्षातील

वॉर्डस्तरीय निधीतील १ कोटी ९७ लाखांचा निधी वर्गीकरणाद्वारे सी. टी. स्कॅन यंत्रासाठी दिल्याचे स्थानिक नगरसेविका अश्विनी कदम यांनी सांगितले होते. मात्र, त्यानंतरही ३३ लाखांचा निधी कमी पडत असल्याने निधीसाठी आयुक्तांकडेविनंती केली.

आयुक्तांनी वैद्यकीय महाविद्यालयासाठी असलेल्या निधीतून ३३ लाख रुपये देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला होता. मात्र, प्रस्ताव पुढे ढकलल्याने नगरसेवक कदम यांनी स्थायी समितीच्या बैठकीतच नाराजी व्यक्त करून सत्ताधाऱ्यांवर आरोप केले होते. यावेळी त्यांना आपले अश्रू अनावर झाले होते. अखेर स्थायी समितीने हा प्रस्ताव मंजूर करून निधी मिळण्याचा मार्ग मोकळा केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.