Mumbai News : भोंग्यासंदर्भात एकत्रित धोरण ठरवा, जातीय तेढ निर्माण केल्यास कठोर कारवाई करा – गृहमंत्र्यांचे पोलीस प्रमुखांना आदेश

एमपीसी न्यूज – राज ठाकरे यांनी गुढीपाडवा आणि त्यानंतरच्या मेळाव्यात मशिदींवरील भोंग्यावरून केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण ढवळून गेले आहे. आरोप प्रत्यारोप सुरु असून धार्मिक तेढ निर्माण होऊ नये यासाठी राज्य शासन आणि पोलीस प्रयत्न करीत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस प्रमुखांना भोंग्याबाबत एकत्रित धोरण ठरविण्याचे आदेश दिले आहेत तसेच जातीय तेढ निर्माण केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यास देखील सांगितले आहे.

“फक्त हिंदू नाही तर मुस्लिमांनाही त्रास होत आहे. अनेक वर्ष हा प्रलंबित राहिलेला विषय आहे. तुम्ही जर पाच वेळा भोंगे लावणार असाल तर आम्ही मशिदीसमोर हनुमान चालिसा लावू. देशभरातील सर्व देशभक्त हिंदू बांधवांना माझी विनंती आहे की तयारीत राहा. सध्या रमजान सुरु असल्याने काही सांगायचं नाही आहे. पण तीन तारखेपर्यंत यांना समजलं नाही आणि देशातील कायद्यापेक्षा, सुप्रीम कोर्टापेक्षा स्वत:चा धर्म, लाऊडस्पीकर मोठे वाटत असतील तर जशास तसं उत्तर देणं गरजेचं आहे,” असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.

राज ठाकरे यांनी दिलेल्या अल्टीमेटमला राजकीय, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातून प्रतीउत्तरे दिली जात आहेत. या अल्टीमेटमच्या विरोधात आणि बाजूने दोन्ही पक्षात चर्चा सुरु आहे. राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या अल्टीमेटमचा उल्लेख केला.

यावरून राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या प्रकरणाची दखल घेत पोलीस प्रमुखांना आदेश दिले आहेत. राज्याचे पोलीस महासंचालक आणि मुंबईचे पोलीस आयुक्त यांनी भोंग्याबाबत एकत्रित धोरण ठरवावे, असे आदेश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहेत.

मुंबई येथे माध्यमांशी बोलताना गृहमंत्री म्हणाले, “राज्याचे पोलीस महासंचालक आणि मुंबईचे पोलीस आयुक्त एकत्रित बसून एक निर्णय घेणार घेतील, गाईडलाईन्स तयार करतील. एक दोन दिवसात राज्यासाठी एकत्रित असं धोरण ठरवलं जाईल. मुंबईसह राज्यासाठी नोटीफिकेशन काढलं जाईल आणि त्यातून नियमावली जाहीर करण्यात येईल”.

गृहमंत्री पुढे म्हणाले, “मी अनेकदा सांगितलं आहे की, जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये. जाणीवपूर्वक कोणाकडून प्रयत्न झाला तर आणि त्याच्यात तो दोषी आढळला तर त्याच्यावर कारवाई केली जाईल मग ती संघटना असो, व्यक्ती असो किंवा आणखी कोणीही असो,”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.