Pune News : ‘ अर्थचक्रा’ साठी बँक कर्मचाऱ्यांचे योगदान महत्वाचे – डॉ. भागवत कराड

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या संकटाला न घाबरता बँक कर्मचारी आणि अधिकारी यांनी धैर्याने तोंड देत माणुसकी जपत ‘अर्थचक्र’ सुरू ठेवले. त्यामुळे कोरोनाच्या काळात डॉक्टर, नर्सेस, पोलीस यासह बँक कर्मचाऱ्यांनी दिलेले योगदान महत्तवाचे असून ते विसरता येणार नाही, अशा शब्दात केंद्रीय अर्थमंत्री डॉ. भागवत कराड यांनी शनिवारी बँक कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

कोरोनाच्या काळात नागरिकांच्या सेवेसाठी आपल्या जीवाची कोणतीही पर्वा न करता बँक कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य पार पाडले. त्यांच्या या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘आरोग्यम् धनसंपदा ‘ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात डॉ. कराड यांच्या हस्ते विविध बँक कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. शिवसमर्थ प्रतिष्ठान, पुणे अकॅडमी फॉर अँडव्हान्स स्टडीज् आणि बँक कर्मचारी संघ, पुणे यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम घेण्यात आला. स. प. महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई हॉल येथे हा कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमासाठी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, शिवसमर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि भाजपचे शहर सरचिटणीस दीपक नागपुरे, एनवायसीएसचे अध्यक्ष राजेश पांडे, नगरसेवक धीरज घाटे, शि. प्र. मंडळीचे अध्यक्ष एस.के. जैन, बँक कर्मचारी संघाचे सरचिटणीस बापू मानकर यावेळी उपस्थित होते.

आरोग्य सेवा अधिक सक्षम व्हावी, यासाठी चालू वर्षाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात आरोग्यासाठी दोन लाख ३४ हजार कोटी रुपयांच्या निधीची भरीव तरतूद उपलब्ध करून देण्यात आल्याचे अर्थराज्यमंत्री डॉ. कराड यांनी सांगितले. देशातील अशा प्रकारचा हा पहिलाच कार्यक्रम असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.

कोरोनाच्या संकटात भाजपच्या प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ‘सेवा ही संघटना ‘ या माध्यमातून काम केल्याचेही ते म्हणाले. कोरोनाच्या काळात ग्राहकांशी एकरूप होऊन बँक कर्मचाऱ्यांनी काम केले, अशा बँक कर्मचाऱ्यांच्या पाठीवर थाप मारण्यासाठी हा कार्यक्रम महत्वाचा आहे, असे खासदार बापट यांनी आपल्या मनोगतात सांगितले.

बँक कर्मचाऱ्यांचे काम अद्वितीय आहे. अनेक घटकांनी या काळात योगदान दिले आहे. बँक कर्मचाऱ्यांबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी असे कार्यक्रम झाले पाहिजेत, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी सांगितले. कोरोनाच्या आजारामुळे निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. दरम्यान, एनवायसीएसचे अध्यक्ष राजेश पांडे यांनी देखील यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमात शासकीय, सहकारी बँक, पतसंस्थेतील तीनशेहून अधिक कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. श्रीपाद ढेकणे यांनी केले, तर दीपक नागपुरे यांनी स्वागत केले. आभार बापू मानकर यांनी मानून कार्यक्रमाची सांगता केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.