Pune News :  दोन वर्षीय चिमुरड्याच्या मृत्यूने अवघे गाव हळहळले

एमपीसी न्यूज –  पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील अवसरी गावातून कृष्ण विलास गाढवे हा दोन वर्षांचा चिमुरडा सोमवारी सकाळी घराच्या अंगणातून अचानक गायब झाला होता. कुटुंबियांनी खूप शोधाशोध केली परंतु तो सापडला नाही. मात्र मंगळवारी सकाळी घराच्या जवळच असणाऱ्या गोबर गॅसच्या टाकीत त्याचा मृतदेह सापडला. या घटनेने आंबेगाव तालुक्यावर शोककळा पसरली आहे. एकुलता-एक असलेल्या मुलाच्या मृत्यूने गाढवे कुटुंबीयांवर मात्र दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आंबेगाव तालुक्यातील शिंगवे वस्ती येथील घरासमोर कृष्णा सोमवारी सकाळी खेळत होता. दरम्यान अचानक कृष्णा बेपत्ता झाल्याने कुटुंबीय दुःखात होते. या परिसरात बिबट्यांचा वावर असल्याने त्याला बिबट्याने चोरून नेले असावे अशा चर्चा येथील नागरिकांमध्ये सुरू झाली. वनविभागाला याची माहिती दिल्यानंतर आसपास असणार्‍या उसाच्या शेतात कृष्णाचा शोध सुरू झाला. परंतु दिवसभर शोधाशोध केल्यानंतर सुद्धा कृष्णाचा तपास लागला नव्हता. दरम्यान, अंधार झाल्यानंतर हे तपास कार्य थांबविण्यात आले होते.

पुन्हा आज सकाळी पुन्हा शोध घेत असताना घराजवळच असणाऱ्या गोबर गॅसच्या टाकीत काही तरंगताना आढळून आले. त्यानंतर गाढवे कुटुंबियांनी या टाकीत शोध घेतला असता कृष्णा चा मृतदेह आढळला. दरम्यान खेळता-खेळता कृष्णा या टाकीत पडला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे. परंतु दोन वर्षे चिमुरड्याचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने संपूर्ण आंबेगाव तालुक्यावर मात्र शोककळा पसरली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.