Pune Crime New :  पुण्यातील धक्कादायक प्रकार! आजारी श्वानाला क्रूररित्या ठार मारले, गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – आजारी असल्यामुळे विव्हळणाऱ्या एका मुक्या जीवाला क्रूररित्या ठार मारल्याचा प्रकार पुण्याच्या दत्तवाडी परिसरात उघडकीस आला. याप्रकरणी अमोल खेडकर या माथेफिरू तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. एका 52 वर्षीय महिलेने या प्रकरणी दत्तवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, राणी नावाचे हे श्वान मागील अनेक वर्षापासून दत्तवाडी परिसरात राहत होते. आजारी असल्यामुळे मागील काही दिवसांपासून ते निपचित पडून होते. परिसरातील नागरिकांचा लाडक्या असलेल्या या श्वानाची देखभाल येथील नागरिक करत होते. परंतु त्रास होत असल्यामुळे हे श्वान रात्री-अपरात्री विव्हळत होते. तिच्या या विव्हळण्याचा दत्तवाडी परिसरात राहणाऱ्या अमोल खेडकरला मात्र राग येत असे.

याच रागातून त्याने सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास तिच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार केले. यामध्ये गंभीररीत्या जखमी झालेल्या राणीला उपचारासाठी प्राण यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचार सुरू असताना तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान श्वानाला अशाप्रकारे क्रूररित्या ठार मारल्याने दत्तवाडी पोलिसांनी अमोल खेडकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.