Pimpri News: समोरच्या व्यक्तीच्या विचारांचा सन्मान करण्याची बाबासाहेबांची शिकवण सर्वांनी अंगीकारावी – डॉ. जितेंद्र आव्हाड

एमपीसी न्यूज – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय मिळवून दिला. समोरच्या व्यक्तीच्या विचारांचा सन्मान करणे ही बाबासाहेबांची शिकवण आहे. ही शिकवण सर्वांनी अंगीकारणे गरजेचे आहे. तसेच बाबासाहेबांसारखे बहुआयामी व्यक्तिमत्व भारतात जन्माला येणे हे भारतीयांचे भाग्य आहे, असे प्रतिपादन राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी  केले.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी येथे क्रांतिसूर्य महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. याठिकाणी जितेंद्र आव्हाड यांनी भेट दिली आणि उपस्थित नागरिकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देताना ते बोलत होते. अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे आणि जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड  यांनी आव्हाड यांचे स्मृती चिन्ह देऊन स्वागत केले. यावेळी विचारपिठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, श्याम लांडे, पंकज भालेकर, गोरक्ष लोखंडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले, समाजातील सर्वच स्त्रियांसाठी बाबासाहेबांचे योगदान खूप मोठे आहे. त्यासाठी महिलांनी देवाच्या शेजारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावावा. आज देशात सुरु असलेला नदी जोड प्रकल्प बाबासाहेबांनी 80 वर्षापूर्वी भारत देशात राबवला होता, त्यामुळे बाबासाहेबांची विकासाची दूरदृष्टी कळते. एस. सी. एस.टी. वर्गाचे आरक्षण भारतीय संविधानामुळे सुरक्षित असले तरी ओ.बी.सी.वर्गाच्या आरक्षणाचा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे. त्यासाठी  ओ.बी.सी. समूहाने एकत्रित होऊन आरक्षणाची लढाई लढली पाहिजे.

आरक्षण गेल्यास काहीच मिळणार नाही. संविधानाचे महत्व समजून घेऊन या संविधानाचे रक्षण केले पाहिजे. ही  आपली जबाबदारी असून आपण ती  प्रामाणिकपणे पार पाडली नाही तर प्रतिगामी शक्ती या देशाची धर्म, जात, पंथ आणि प्रांत अशा चार भागात विभागणी करतील, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. संसदेत आता  कायदा पारीत करण्याच्या प्रक्रियेला डावलून कायदे पारित केले जात आहेत. हे संविधानासाठी घातक आहे, असेही  ते म्हणाले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.