Dehuroad News : निर्धारित वेळेपेक्षा अधिक वेळ हॉटेल सुरू ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – शनिवारी आणि रविवारी फक्त घरपोच पार्सल सेवा सुरू ठेवण्याचे आदेश दिलेले असताना देहूरोड येथील हॉटेल कृष्णा पॅलेस ग्राहकांसाठी सुरू ठेवले. याबाबत हॉटेल चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 12)  रात्री साडेअकरा वाजता करण्यात आली.

 मनोज शिरीषसुंदर सिंग (वय 25, रा. हॉटेल कृष्णा पॅलेस, शिवाजीनगर देहूरोड) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई सुमित मोरे यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूरोड परिसर हा देहूरोड कँटोन्मेंट बोर्डाच्या अखत्यारित येतो. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार देहूरोड कन्टोनमेंट बोर्डाला पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील नियम लागू राहणार आहेत. त्यानुसार हॉटेल, रेस्टॉरंट, बार यांना शनिवारी व रविवारी केवळ घरपोच पार्सल सेवा रात्री अकरा वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कोरोना साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हे प्रतिबंधात्मक आदेश देण्यात आले आहेत. असे असताना आरोपीने त्याचे हॉटेल शनिवारी रात्री अकरा वाजल्यानंतर देखील ग्राहकांसाठी सुरू ठेवले. तसेच लोकांना हॉटेलमध्ये बसवले. याबाबत पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.