Maval News : कामशेत-नाणे रस्त्याच्या दुरुस्तीसाठी दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध!

एमपीसी न्यूज – मागील अनेक वर्षांपासून डागडुजी पासून वंचित असलेल्या कामशेत नाणे रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. रस्त्याची डागडुजी करून पावसाळयात पाण्याखाली जाणा-या या रस्त्याचा प्रश्न आता सुटणार आहे. दरवर्षी पावसाळ्यात इंद्रायणी नदीला आलेल्या पुरात पाण्याखाली जाणाऱ्या कामशेत-नाणे रस्त्याची रुंदी व उंची वाढविणे, डांबरीकरण करणे या कामासाठी आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून सुमारे दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. गुरुवारी (दि. १६) या कामाचे भूमिपूजन करून कामास सुरुवात करण्यात आली.

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते दत्तात्रय आंद्रे, माजी उपसरपंच प्रकाश आगळमे, मावळ तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष कैलास गायकवाड, नारायण मालपोटे, देविदास गायकवाड, मधुकर वाघुले, माजी सरपंच साईनाथ गायकवाड, राष्ट्रवादी कॉंग्रेस कामशेत शहराध्यक्ष गजानन शिंदे, सोमनाथ आंद्रे, बाळासाहेब दळवी, इंदाराम उडे, अमोल कोंडे, नितीन शेलार, अनिकेत शिंदे, शेखर कटके,सचिन नवघणे, माऊली कदम, दत्तात्रय वाल्हेकर आदि मान्यवर उपस्थित होते.

मागील अनेक वर्षांपासून डागडुजी पासून वंचित असलेल्या कामशेत नाणे दरम्यानच्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती तसेच हा रस्ता वळणाचा व अरुंद असल्याने एकाच वेळी दोन मोठया वाहनांना या रस्त्यावरून जाताना अडथळा निर्माण होत होता. कामशेत नाणे रस्ता हा इंद्रायणी नदी पात्राच्या नजीकच असल्याने पावसाळ्यात दरवर्षी इंद्रायणी नदीस पुर आल्यावर हा रस्ता पाण्याखाली जातो. यामुळे नाणे मावळातील १० ते १२ गावांचा संपर्क तुटतो.

कामशेत मधून नाणे मावळात जाणारा हा एकमेव रस्ता असून, हा रस्ता पाण्याखाली गेल्यावर या भागातील शालेय विद्यार्थी, कामगार, दुग्ध व्यावसायिक, पर्यटक, शेतकरी यांचे कामशेत शहराकडे येण्याचा मार्ग बंद झाल्यामुळे त्यांचे प्रचंड नुकसान व गैरसोय होत होती.

नाणे मावळातील नागरिकांची ही समस्या सोडविण्यासाठी आमदार सुनिल शेळके यांनी कामशेत नाणे दरम्यानच्या रस्त्याची उंची, रुंदी व रस्त्याच्या काही ठिकाणी भिंत बांधण्याच्या कामासाठी सुमारे २ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून त्याअंतर्गत कामशेत नाणे दरम्यानच्या १ किलोमीटर लांबीच्या रस्त्याची उंची १ मीटर ने वाढविण्यात येणार आहे.

या रस्त्याची रुंदी वाढवून साडेपाच मीटर इतकी करण्यात येणार असून रस्त्याच्या लगतचे पाणी रस्त्यावर येऊ नये यासाठी रस्त्याखाली सिमेंटचे पाईप टाण्यात येणार आहे. या रस्त्याचे काम सर्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.