Pune News : एसआरए अंतर्गत अडीच लाखात घर, पुण्यासाठी ही योजना लागू करा – मोहन जोशी 

एमपीसी न्यूज : मुंबईत झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प ( एसआरए) अंतर्गत अडीच लाखात घर उपलब्ध होईल, असा निर्णय महाविकास आघाडी सरकारने  घेतला आहे, हाच निर्णय पुणे शहरासाठीही लागू करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी मुख्य मंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे विधीमंडळ नेते, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे पत्रकाद्वारे केली आहे.

महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने मुंबईतील झोपडपट्टीतील नागरिकांसाठी लागू केलेला हा निर्णय स्वागतार्ह आहे. या निर्णयासाठी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांचे अभिनंदन मोहन जोशी यांनी केले असून, पत्रकात म्हटले आहे की, एसआरए अंतर्गत 2000 सालपर्यंतच्या घोषित झोपड्यांना मोफत घरे दिली जातात. 2000 नंतरच्या झोपड्यांसाठी सरकारकडून 10 ते 15 लाख असे शुल्क आकारले  जात होते. ते आता सरसकट अडीच लाख करण्यात आलेले आहे.

मुंबईप्रमाणे पुण्यातही लोकसंख्येच्या 40 टक्के लोकं झोपडपट्ट्यांमध्ये राहात आहेत. अनेक ठिकाणी एसआरएच्या योजना होत आहेत. हे विचारात घेऊन मुंबईप्रमाणे पुण्यातही घराची किंमत एकच म्हणजे अडीच लाख ठेवावी त्यातून झोपडपट्टीवासियांना दिलासा मिळेल आणि स्वतःचे पक्के घर हे स्वप्नही प्रत्यक्षात उतरेल. महाविकास आघाडी सरकारने ही योजना तातडीने लागू करावी, अशी काँग्रेसची मागणी आहे.

काँग्रेस पक्ष हा गरिबांचा कैवार घेणारा पक्ष असून झोपडपट्ट्यांमधून अनेक सुविधा मिळाव्यात, 500 फुटांपर्यंतचे स्वतःचे घर मिळावे यासाठी अनेकवेळा पाठपुरावा केला. काँग्रेस आघाडी सरकारने त्याप्रमाणे निर्णयही घेतले. महाविकास आघाडी सरकारचा हा निर्णय हे पुढचे पाऊल असून त्यात पुण्यातील झोपडपट्टीवासियांना सामावून घ्यावे असे जोशी यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.