IND VS SL Test Series : भारताची कसोटीसह मालिकेवर जबरदस्त पकड

आणखी एक निर्भेळ विजय केवळ 9 पाऊले दूर

एमपीसी न्यूज (विवेक दिगंबरराव कुलकर्णी) : बंगलोर येथे सुरू असलेल्या दुसऱ्या आणि अंतीम कसोटी सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकन संघाचा पहिला डाव केवळ 109 धावात गुंडाळून आपल्या दुसऱ्या डावाला ९ गडी गमावून 303 धावांवर घोषित करून पाहुण्या संघावर 446धावांची मोठी आघाडी मिळवत या सामन्यावर आपली पकड आणखीन मजबूत करून मालिकाही आपल्या खिशात जवळजवळ घातलीच आहे.

भारताने आपला  दुसरा डाव आजच्या दिवसाचा अगदी थोडाच खेळ बाकी असताना 303 धावावर घोषित करून पाहुण्या संघापुढे पुढील तीन दिवसात 447 धांवा काढण्याचे विशाल लक्ष्य ठेवले आहे.ज्याचा पाठलाग करताना श्रीलंका संघाने आजचा खेळ संपला तेंव्हा एक गडी गमावून 28 धावा केल्या असून त्यांना चमत्कार करण्यासाठी तब्बल 419 धावा हव्या आहेत, ज्या काढण्यासाठी त्यांना खरोखरच काही तरी चमत्कारच करावा लागणार आहे.

अपेक्षेप्रमाणे भारताने पाहुण्या संघांचा पहिला डाव आजच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होताच अगदी काही क्षणातच खतम करून  पहिल्या डावात 143 धावांची मोठी आघाडी घेऊन या सामन्यावरही मजबूत पकड निर्माण केली आहे.वेगवान गोलंदाज आणि भारतीय संघाचा उपकर्णधार जसप्रीत बुमराहच्या एकूण नवव्या  आणि मायदेशातल्या एका डावातल्या पहिल्या पाच बळीच्या कामगिरीमुळे श्रीलंका संघाचा पहिला डाव 109 धावातच संपुष्टात आला.

उत्तरादाखल खेळताना भारतीय संघाने आपल्या दुसऱ्या डावात ऋषभपंतच्या  9 व्या  आणि श्रेयस अय्यरच्या तिसऱ्या अर्धशतकाच्या जोरावर सामन्यावरची आपली आघाडी  मजबूत करून विजयाकडे दमदार पाऊल टाकले.पंतने आज तुफानी फलंदाजी करत केवळ 28 चेंडूतच अर्धशतक पूर्ण करताना महान अष्टपैलू कपीलदेवच्या या आधीच्या विक्रमाला नेस्तनाबूत करत या यादीत आपले नाव प्रथम क्रमांकावर सुवर्णाक्षरात क्रिकेट इतिहासाच्या पुस्तकात लिहले आहे.

कपिलदेवने 1982 साली पाकिस्तान विरुद्ध असेच आक्रमक खेळत केवळ 30 चेंडूत अर्धशतक केले होते तर पंतने आज केवळ 28 चेंडूत भारता तर्फे सर्वाधिक वेगवान अर्धंशतक पूर्ण करताना  7 खणखणीत चौकार आणि दोन उत्तुंग षटकार मारले.

आज सकाळी श्रीलंका संघाने कालच्या सहा बाद 86 वरून पुढे खेळायला सुरुवात केली,पण आज बुमराहने त्यांच्या शेपटाला जराही वळवळू दिले नाही. पाहुण्या संघासाठी एकमेव आशा असणाऱ्या डिकवेलाची एकाकी झुंझार खेळी त्याने संपुष्टात आणली, त्याबरोबरच त्याने फक्त 28 धावा देत पाच गडी बाद करण्याची मोठी कामगिरीही केली,विदेशात अशी कामगिरी 8 वेळा करणाऱ्या बुमराहने आज पहिल्यांदा मायदेशी अशी कामगिरी केली आहे.त्याला अश्विन आणि शमीने दोन दोन बळी घेत चांगली साथ दिली,ज्यामुळे श्रीलंका संघाचा पहिला डाव केवळ 109 धावातच समाप्त झाला.

143 धावांची मोठी आघाडी घेऊन खेळणाऱ्या भारतीय संघाने दुसऱ्या डावातही भक्कम खेळत या सामन्यावर निर्विवाद वर्चस्व कायम राहील यादृष्टीनेच खेळ केला.कर्णधार रोहितच्या झुंजार 46,मयंकच्या 22,हनुमा विहारीच्या 35 धावांच्या जोरावर या आघाडीत बऱ्यापैकी भर घातली. मात्र रोहीत शर्मा,विराट,हनुमा विहारी यांच्या विकेट्स ठराविक अंतराने पडल्यानंतर खेळायला आला तो ऋषभ पंत, त्याने श्रेयस अय्यरच्या जोडीने तुफानी फलंदाजी करत श्रीलंकन गोलंदाजांवर धुवांधार आक्रमन केले.त्याने केवळ 28 चेंडूतत अर्धशतक पूर्ण करताना 7 चौकार आणि दोन षटकार मारले,याच नादात तो अर्धशतक पूर्ण झाल्यावर आणखीन एक उत्तुंग फटका मारण्याच्या नादात झेलबाद झाला.

खरेतर खेळपट्टीचा अंदाज बघता आणि श्रीलंकन फलंदाजीची ताकत बघता भारतीय संघ यावेळेसच आपला डाव घोषित करेल असे वाटत होते,पण रोहीत शर्माच्या मनात मात्र काही तरी वेगळेच होते.देशासाठी खेळताना वैयक्तिक विक्रमाला फारसे महत्व दिले जात नाही हे जरी सत्य असले तरी सामन्याचा आजचा केवळ दुसराच दिवस असल्याने त्याने श्रेयस अय्यरला आणखी एक मोठी खेळी करण्याची संधी दिली असावी असे वाटत होते.

त्यात खरे काय नी खोटे काय हे रोहीतच जाणो परंतू श्रेयसने मात्र या संधीचा पुरेपूर फायदा घेत दुसऱ्या डावातही या खतरनाक खेळपट्टीवर जबरदस्त तंत्र दाखवत आपले वैयक्तिक तिसरे आणि या कसोटीतले दुसरे अर्धशतक पूर्ण करत जडेजा सोबत सहाव्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारीही पूर्ण केली. आणि तरुण, नवोदित खेळाडुला योग्यवेळी संधी दिल्याचा काय फायदा होतो याचा जणू एक संदेशही पुजारा, रहाणेला खराब कामगिरीनंतरही बाहेर काढल्याबद्दल होणाऱ्या टीकेला दिला.

श्रेयसचे अर्धशतक पूर्ण होताच जडेजा वैयक्तिक 22 धावांवर असताना विश्व फर्नांडोच्या गोलंदाजीवर बॅटवर लागलेला चेंडु यष्ट्यावर पडल्याने त्रिफळा बाद झाला,यानंतरही रोहीतने डाव घोषित न करता अश्विनला पाठवुन लंकन गोलंदाजाना पूर्णपणे थकवण्याचा हेतू असल्याचे स्पष्ट केले.मात्र या संधीचा पुरेपूर लाभ श्रेयस अय्यरला उठवता आला नाही, आणि तो  67 धावा काढून एमब्लुडेंनीच्या गोलंदाजीवर पायचीत झाला.

त्यानंतर थोड्याच वेळात भारतीय संघांने आपला दुसरा डाव घोषित केला.श्रीलंका संघाकडून दुसऱ्या डावात जयविक्रमाने 78 धावा देत सर्वाधिक चार गडी बाद केले तर एमब्लुडेंनीने 87 धावा देत तीन गडी बाद केले.भारतीय संघाकडून श्रेयसने सर्वाधिक 67 तर पंतने 50 धावा केल्या. 447 धावांचे विशाल लक्ष्य श्रीलंका संघासाठी खरे तर मेलेल्याला उगाचच मारण्यासारखेच होते,क्रिकेट हा कितीही बेभरवशाचा खेळ असला तरी,अनिश्चितता असलेला असला तरीही आजच्या  लंकन संघाला खरेतर 350 धावा सुद्धा खूप होत्या, चतुरस्त्र कर्णधार म्हणून अल्पावधीतच ओळखला जावू लागलेला रोहीत आपला दुसरा डाव इतका लांबवेल असे कोणालाही वाटले नव्हते, पण त्याने तसेच करताना संपूर्ण खबरदारी घेतली हेच खरे.

श्रीलंका संघाची सुरुवात दुसऱ्या डावातही अतिशय खराब झाली,या सामन्यात जबरदस्त लय सापडलेल्या बुमराहने दुसऱ्या डावातल्या पहिल्याच षटकात लाहीरू थिरमनेला एका जबरदस्त इनस्विंगवर पायचीत करुन भारतीय संघाला अपेक्षित अशीच सुरुवात करून दिली.त्यानंतर मात्र उरलेल्या खेळात कुशल मेंडीस आणि दिमुथने आपल्या विकेट्स सांभाळत 28 धावा धावफलकावर लावल्या आहेत,अजूनही श्रीलंका संघ 419 धावांच्या पिछाडीवर आहे. आजची तब्बल 14 गडी बाद झालेले असल्याने उद्या लंकन फलंदाज काय करणार याचे उत्तर कोणालाही मुळीच अनपेक्षित नक्कीच नाही.उद्या बुमराह आणि कंपनी किती वेळात लंकादहन करणार हेच बघणे औत्सुक्याचे असेल,नाही का?

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.