IPL 2022 : राजस्थानने पंजाबवर सहा गडी राखून मिळवला दणदणीत विजय

एमपीसी न्यूज – विवेक कुलकर्णी – पंजाब सुपर किंगसवर सहा गडी राखून दणदणीत (IPL 2022 )विजय मिळवून राजस्थानने आणखी दोन गुणांची कमाई करत आपल्या प्ले ऑफची आशा आणखी बळकट केली आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानावर आजच्या पहिल्या सामन्याला पंजाब विरुद्ध राजस्थान या दोन संघात लढत झाली. ज्यात राजस्थानने पंजाबवर सहा गडी राखून रॉयल विजय मिळवला आहे.

आज पंजाब संघाचा कर्णधार मयंकच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आणि त्याने क्षणार्धात प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शिखर धवन आणि जॉनी बेअरस्टो यांनी डावाची चांगली सुरुवात केली, मात्र धवन आज आपल्या किर्तीला आणि या मोसमातल्या फॉर्मला जागू शकला नाही. 47 धावाची (IPL 2022) सलामी जोडल्यानंतर धवन 12 धावा काढून रवीचंद्रन अश्विनच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या भानुपक्षेने नेहमीप्रमाणे आपल्या आक्रमक शैलीत खेळायला सुरुवात केली. बघताबघता या जोडीने अर्धशतकी भागीदारीही नोंदवली.

 

यात भानूपक्षेचा (IPL 2022) वाटा होता 27धावांचा, ज्या आल्या होत्या फक्त 18 चेंडूत! ज्यात होते दोन चौकार आणि 2 षटकार, मात्र ही आक्रमकताच त्याला आणि पंजाब संघाला भोवली.  आतापर्यंत सर्वाधिक 18 बळी मिळवून पर्पल कॅप आपल्याकडे ठेवणारा आणि अतिशय चतुर आणि तितकाच धोकादायक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चहलने त्याला आपल्या फिरकीवर नाचवत त्याला त्रिफळाबाद केले आणि पंजाब संघाला मोठा धक्का देत राजस्थानसाठी  धोकादायक ठरत असलेली भागीदारीही तोडली. त्याच्या जागी आलेल्या कर्णधार मयंक आगरवाल आजही आपल्या संघासाठी बॅटने विशेष काही योगदान देऊ शकला नाहीच, आणि चहलला एक जोरदार फटका मारण्याच्या नादात बटलरच्या हातात झेल देऊन 15 धावा काढून तंबूत परतला. आणि याच षटकात चहलने बेअरस्टोलाही बाद करून पंजाब संघाला चांगलेच अडचणीत आणले.

IPL 2022 punjab failed

जॉनी बेअरस्टो चांगला खेळत होता. त्याने एक बाजू चांगलीच लावून धरली होती. आपले आयपीएलमधले 8 वे अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर आणि जम बसल्यावरही तो 56 धावा करुन बाद झाला आणि पंजाब संघ चांगलाच अडचणीत आला. यावेळी पंजाब संघाची धावसंख्या 15 व्या षटकात 4 बाद 119 अशी होती. यानंतर मात्र जितेश शर्मा आणि लिविंगस्टोनने आक्रमक फलंदाजी करत पंजाब संघाला बऱ्यापैकी धावसंख्या गाठून देण्यात यश मिळवले. या जोडीने 25 चेंडूत 50 धावांची वेगवान भागीदारी केली.

19 व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर लिविंगस्टोन प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर 22 धावा काढून बाद झाला. पण, त्याने तोवर पंजाब संघाला चांगल्या स्थितीत आणून ठेवले होते. त्याला जितेश शर्मानेही चांगली साथ दिली आणि तो बाद झाल्यानंतरही त्याने जबरदस्त फटकेबाजी करत पंजाब संघाला 189 धावांची चांगली आणि आव्हानात्मक धावसंख्याही गाठून दिली. जितेशने फक्त 18 चेंडूत वेगवान 38 धावा काढताना 4 चौकार आणि दोन षटकार मारले. यामुळेच पंजाबने आपल्या 20 षटकात 5 गडी गमावून 189 धावा करण्यात यश मिळवले. राजस्थानसाठी यजुर्वेद्र चहलने सर्वाधिक तीन बळी मिळवले, तर प्रसिद्ध कृष्णा आणि अश्विनने प्रत्येकी एकेक गडी बाद केला.

उत्तरादाखल खेळताना राजस्थान रॉयल्सने जॉस बटलर आणि यशस्वी जैस्वाल या जोडीला सलामीला पाठवले. या दोघांनी 24 चेंडूतच 46 धावांची खणखणीत सलामी दिली. बटलर तसाही या स्पर्धेत प्रचंड फॉर्मात आहेच. तो आत्मविश्वास त्याच्या फलंदाजीत दिसतोच. आज मात्र बटलर 16 चेंडूत 30 धावा ठोकून रबाडाच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या संजू सॅमसनलाही आज फारश्या धावा करता आल्या नाहीत आणि तोही फक्त 23 धावा करुन ऋषी धवनच्या गोलंदाजीवर बाद झाला.

IPL 2022 Rajsthan vs punjab

त्यानंतर मात्र, यशस्वी जैस्वाल आणि देवदत्त पडीकल या जोडीने धीराने खेळत डाव सावरला आणि तिसऱ्या गड्यासाठी 61 धावांची बहुमूल्य भागीदारीही केली. 68 धावांची चांगली खेळी करून यशस्वी जैस्वाल अर्शदीपच्या गोलंदाजीवर बाद झाला. पण, त्याने तोवर राजस्थानसाठी विजयाचा मार्ग सोपा करून ठेवला होता. उरलेले काम देवदत्त पडीकल आणि शिमरन हेटमायरने पूर्ण केले. विजय हाकेच्या अंतरावर आलेला असताना पडीकल घाई करुन बाद झाला. पण, हेटमायरने ती औपचारिकता पूर्ण केली आणि राजस्थानला आणखी एक रॉयल विजय मिळाला.

संक्षिप्त धावफलक

पंजाब किंग्ज
5 बाद 189

बेअरस्टो 56, धवन 12, राजपक्षे 28, लिविंगस्टोन 22, जितेश शर्मा नाबाद 38
चहल 28/3, आर अश्विन 32/1, कृष्णा 48/1

पराभूत विरुद्ध

राजस्थान रॉयल्स

4 बाद 190
जैस्वाल 68, सॅमसन 23 ,बटलर 30, पडीकल 31, हेटमायर नाबाद 31
अर्शदीप 29/2, धवन 25/1

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.