Pimpri News : ‘शाहू, फुले, आंबेडकर यांचे नाव घेतले म्हणजेच…पण, ते समजायला अक्कल लागते’

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांचा राज ठाकरे यांना सणसणीत टोला

एमपीसी न्यूज – मनसेप्रमुख राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शरद पवार हे शाहू, फुले, आंबेडकर यांचे नाव घेतात पण छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेत नाहीत असा आरोप ठाकरे यांनी केला होता. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर देताना म्हटले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शाहू, फुले यांना आदर्श मानून संविधान लिहिले आहे.

म्हणजे शाहू, फुले यांचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज होते. त्यामुळे या तिघांचे नाव घेतले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेतल्यासारखे आहे. पण, हे समजण्यासाठी अक्कल लागते, असा सणसणीत टोला राज ठाकरे यांना लगावला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरी येथे क्रांतिसूर्य महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. याठिकाणी जितेंद्र आव्हाड यांनी भेट दिली. या व्यासपीठावरूनच त्यांनी राज ठाकरे यांना जोरदार प्रत्युत्तर दिले.  छत्रपती शिवाजी महाराज यांची  जगाला वाट दाखवण्याचे काम महात्मा फुले यांनी केले. फुले यांनी जे कार्य केले त्यांचा प्रभाव, आदर्श शिवाजी महाराज होते. सती प्रथेची व्यवस्था समाजात होती, त्याच काळात शिवाजी महाराज यांनी आईला सती जाऊ दिले नव्हते. ते कर्मकांडाच्या कायम विरोधात होते.

फुले यांची भूमिका शिवाजी महाराज यांच्याकडून प्रेरित होती. त्यामुळे ते शिवाजी महाराज यांचे वारसदार होते. शाहू महाराज तर त्यांचे रक्ताचे वारसदार होते. म्हणून या दोघांना आदर्श मानतो आणि संविधान लिहितो असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा वारसा संविधानात आला. फुले, शाहू यांना संविधानात बंद केले. या तिघांचे नाव घेतले तर शिवाजी महाराज यांच नाव घेतल्यासारखे आहे. पण हे समजायला अक्कल लागते, असा टोला आव्हाड यांनी राज ठाकरे यांना लगावला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.