Maval News : …अन्यथा सोमाटणे टोल नाका बंद करण्यासाठी सर्वपक्षीय आंदोलन – किशोर आवारे

सोमाटणे टोलनाक्याविषयीचा निर्णय राज्य शासनाच्या कक्षेत, नितीन गडकरी यांनी राज्य शासनाकडे टोलवला चेंडू!

एमपीसी न्यूज – पुणे-मुंबई महामार्गावरील सोमाटणे टोल नाका हा बेकायदेशीर असून त्यात अनेक बड्या धेंडांचे हितसंबंध गुंतले असून त्या ठिकाणी नागरिकांची लूट सुरू आहे. हा टोलनाका बंद करण्याबाबत आठ दिवसांत कार्यवाही सुरू झाली नाही तर जनसेवा विकास समिती तसेच तळेगावातील सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते तीव्र आंदोलन करतील, असा इशारा जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांनी दिला आहे.

तळेगावा दाभाडे येथील जनसेवा विकास समितीच्या पदाधिकाऱ्यांनी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांच्या प्रयत्नातून केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली, त्यानंतर आवारे बोलत होते. या भेटीत भाजप नेते एकनाथ पवार तसेच जनसेवा विकास समितीचे मिलिंद अच्युत, अनिल भांगरे, कल्पेश भगत, सुनील पवार आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रीय महामार्गांवरील 60 किमी अंतराच्या आतील टोलनाके बंद करण्याची घोषणा गडकरी यांनी लोकसभेत केली. त्याबद्दल जनसेवा विकास समितीने गडकरी यांचे अभिनंदन केले. पुणे-मुंबई महामार्गावरील अनधिकृत सोमाटणे टोल नाका केंद्र सरकारने तातडीने बंद करावा, अशी मागणी करणारे लेखी निवेदन गडकरी यांना देण्यात आले.

गडकरी यांनी सदरचे निवेदन काळजीपूर्वक वाचून त्यांचा निर्णय व केंद्राची भूमिका उपस्थित पदाधिकाऱ्यांना समजावून सांगितली. सदरचा टोलनाका हा राष्ट्रीय महामार्गावर असला तरी त्याचे पूर्ण अधिकार हे राज्य शासनाच्या ताब्यात दिलेले असून या टोलनाक्याच्या संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार फक्त राज्यशासनाकडे राखीव असल्याचे त्यांनी नमूद केले.

सोमाटणे टोलनाका बंद करण्याच्या विषयाचा चेंडू गडकरी यांनी राज्य शासनाच्या कोर्टात टोलवला आहे. राज्यशासनाच्या आदेशाप्रमाणे दोन टोलनाक्यांमधील अंतराची मर्यादा ही 45 किमीची असून त्या मर्यादेत सुद्धा सोमाटणे टोलनाका बसत नाही, याकडे जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे लक्ष वेधले.

सोमाटणे टोलनाका अनधिकृत आहे हे आम्ही वेळोवेळी पुराव्यांनिशी सिद्ध करत आलो आहोत. हा टोलनाका अधिकृत आहे, हे टोलनाका व्यवस्थापनाने येत्या आठ दिवसांत सिद्ध करावे. जर येत्या आठ दिवसात टोलनाका बंद करण्याबाबत पाठपुरावा झाला नाही तर आम्ही जनसेवा विकास समिती तसेच तळेगावातील सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते तीव्र आंदोलनाची घोषणा करत आहोत, असा इशारा आवारे यांनी दिला.

सदरचा विषय हा आर्थिकदृष्ट्या तसेच सामाजिकदृष्टया नागरिकांच्या आयुष्यावर मोठा दुष्परिणाम करत आहे. आम्ही हा लुटमारीचा अन्याय सहन करणार नाही, अशी मी सर्वपक्षीय नेत्यांच्या तसेच तळेगावकर नागरिकांच्या वतीने ग्वाही देतो. तळेगावात आमचे राजकीय दंद्व असेल किंवा राजकीय संघर्ष असेल, पण सामान्य नागरिकांच्या आर्थिक आणि सामाजिक हिताचा प्रश्न ऐरणीवर येतो तेव्हा आम्ही सगळे राजकीय नेते तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते एक होऊन लढा देतो, असे ते म्हणाले.

गावावर संकट येते तेव्हा आम्ही 105 होतो आणि लढतो, हा इतिहास आहे, जुने जाणते असंही सांगतात की, तळेगावाला पाच पांडवानीही हात जोडले आहेत, असा शेराही आवारे यांनी मारला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.