Pune News : कॅनॉल रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी ‘स’ यादीतून निधी घ्यावा; मंजुषा नागपुरे यांचे पालिका आयुक्तांना पत्र

एमपीसी न्यूज – सिंहगड रस्त्याला पर्यायी रस्ता म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजाविणाऱ्या वडगाव बुद्रुक ते पु.ल. देशपांडे उद्यान दरम्यान असलेल्या कॅनॉल रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे. तसेच या रस्त्याच्या कामासाठी काही निधी कमी पडत असल्यास आपल्या ‘स’ यादीतून 50 टक्के निधी देण्याची तयारी नगरसेविका मंजुषा नागपुरे यांनी दाखविली आहे. त्याबाबतचे पत्र नागपुरे यांनी महानगरपालिका आयुक्तांना दिले आहे. 

सिंहगड रस्त्यावर राजाराम पूल ते फन टाईम थिएटर असा उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. या कामामुळे पुढील काही वर्षे या रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ शकते. ही कोंडी कमी करण्यासाठी या भागातील कॅनॉल वरून जाणारा 7.5 मीटर रुंदीचा डीपी रस्ता हा पर्यायी रस्ता लवकरात लवकर सुरु करणे गरजेचे आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण होणे गरजेचे आहे.

या रस्त्याच्या कामासाठी आवश्यक असलेला निधी कमी पडत असल्याचे समोर आले आहे. निधी अभावी हे काम रखडल्यास त्याचा त्रास या भागातील नागरिकांना सहन करावा लागणार आहे. या कामासाठी कमी पडत असलेला निधी सन 2021-22 च्या म्हणजे चालू आर्थिक वर्षातील ‘स’ यादीतील निधी मधून घ्यावा, असे पत्र नगरसेविका नागपुरे यांनी पालिका आयुक्त विक्रम कुमार यांना दिले आहे.

आपल्या  ‘स’ यादीतील एकूण तरतुदी मधून पन्नास टक्के निधी प्रभागातील विकास कामांसाठी राखीव ठेवावा तसेच उर्वरित पन्नास टक्के निधी या रस्त्यासाठी म्हणजे ‘वडगाव बुद्रुक ते पु.ल. देशपांडे उद्यान आणि त्यापुढे जनता वसाहत पर्यंत कॅनॉल लगतचा साडेसात मीटर रुंदीचा डीपी रस्ता’ पूर्ण करण्यासाठी  प्रशासनाने खर्च करावा, असे या पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, मंजुषा नागपुरे म्हणाल्या, सिंहगड रस्त्यावर उड्डाणपुलाचे काम सुरू होणार असल्याने या कामामुळे वाहतुकीची कोंडी होणार आहे. यासाठी पर्यायी रस्ता म्हणून कॅनॉल रस्ता सुरू होणे अत्यंत आवश्यक आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.