Pimpri News : जीवन शिक्षणच्या संपादन मंडळावर साहित्यिक श्रीकांत चौगुले यांची निवड

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाचे, मुखपत्र समजल्या जाणाऱ्या जीवन शिक्षण या मासिकाच्या संपादनासाठी, संपादन मंडळ सदस्य म्हणून पिंपरी-चिंचवड शहरातील साहित्यिक श्रीकांत चौगुले यांची निवड करण्यात आली आहे.

चौगुले हे लेखक म्हणून परिचित आहेत. त्यांची विविध विषयांवरची दहा पुस्तके प्रकाशित असून, यापूर्वी त्यांनी बालभारती पाठ्यपुस्तक मंडळात, संपादन मंडळ सदस्य म्हणून काम केले आहे. तसेच साहित्य परिषदेच्या साहित्य विशारद या परीक्षेच्या अभ्यासक्रम समितीतही त्यांचा समावेश होता. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे जीवन शिक्षण अंकाची निर्मिती होते व ते मासिक महाराष्ट्रातील सर्व शाळांना वितरित करण्यात येते. या मासिकाला दीडशे वर्षांची समृद्ध परंपरा आहे.

चौगुले पिंपळे सौदागर येथील अण्णासाहेब मगर विद्यालयात शिक्षक असून अनेक राज्यस्तरीय शैक्षणिक उपक्रमात त्यांचा सहभाग असतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.