Manobodh by Priya Shende Part 84 : मनोबोध भाग 84 – विठोने शिरी वाहिला देवराणा

एमपीसी न्यूज – मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक 84

विठोने शिरी वाहिला देवराणा

तया अंतरी ध्यास रे त्यासी नेणा

निवाला स्वये तापसी चंद्रमोैळी

जीवा सोडवी राम हा अंतकाळी

 

 

 

 

देवांचे देव महादेव यांचेच उदाहरण पुन्हा एकदा  ह्या श्लोकात रामदास स्वामींनी दिलं आहे.  पण ह्या वेळेस शंकर महादेवांन सोबत विठुरायाचा पण उल्लेख या श्लोकात आला आहे.

ते सांगताहेत की,”विठोने शिरी वाहिला देवराणा, तया अंतरी ध्यास रे त्यासी नेणा”
समस्त वारकरी पंथाचं, संत.. अनेक दिग्गज जन यांचं श्रद्धास्थान कोण तर विठुराया. विठोबा माऊली.  तर त्या विठोबांनी शंकर महादेवांना, शिरी वाहिला देवराणा म्हणजेच शंकराची भक्ती विठोबारायाने केली.. जेव्हा आपण एखाद्याचा सन्मान करतो, भक्ती करतो.. तेव्हा त्याला डोक्यावर घेतो.  म्हणजेच त्याचा उदो उदो करतो.  तर समर्थ म्हणताहेत की, आपल्या सर्वांचा लाडका विठोबा, ज्याच्यासाठी लोक कित्येक मैल, कित्येक वर्षे वारी करतात, तो विठोबा शंकर देवाला भजतो. त्याला डोक्यावर घेतो.  त्या शंकराच्या हृदयात श्रीराम वसले आहेत. ते शंकर रामनाम जपतात. जे तुम्ही समजून घ्या. “तया अंतरी ध्यास रे त्यासी नेणा” म्हणजे हे लोक हो.. हे तुम्ही समजून घ्या. किती सुंदर लिहिलंय.  तर रामानामाचा महिमा समजून घ्या.

पुढे समर्थ म्हणत आहे की, “निवाला स्वये तापसी चंद्रमौळी, जीवा सोडवी राम हा अंतकाळी”. चंद्रमौळी म्हणजे शंकर महादेव जसे अत्यंत भोळे, तसेच तामसी.. हे सगळ्यांना माहित आहे.  जेवढे ते कृपा करतील तेवढाच त्यांचा राग, कोप याने तिसरा डोळा उघडून ते सृष्टी सुद्धा जाळून भस्म करतील. इतका त्यांचा राग वाईट आहे. इतके तामसी शंकर त्यांचा दाह शमवण्यासाठी,  निववण्यासाठी रामाची भक्ती करतात. त्यांचं नाम जपतात. तर आपल्या संसाराचे नाव पार करण्यासाठी आपण राम नाम घ्यावे.  त्याची भक्ती करावी. त्यालाच शरण जावे.  त्याच्या चरणाशी लीन होऊन आपली जागा मिळवावी, म्हणजे आपली मुक्तीच्या दिशेने वाटचाल व्हायला सुरुवात होईल. शेवटी जीवाला सोडवणारा रामच आहे.  अंतकाळी मुक्ती देणारा रामच आहे.

अत्यंत अवघड तपस्या न करता, केवळ सोप्या असणाऱ्या रामनामाने जर आपली जीवन नाैका पार पडते तर आपण त्याचं महत्त्वं जाणून घेऊयात. आणि रामनामाचा महिमा ओळखून, त्याचे महत्त्वं जाणून घेऊन श्रीरामांना भजूयात. शेवटी मुक्ती देणारे तेच आहेत.

जय जय रघुवीर समर्थ

प्रिया शेंडे
मोबाईल 7020496590

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.