Maval: भाजपने शिवसेनेपेक्षा दोन पाऊले पुढे जाऊन काम केले – श्रीरंग बारणे

शिवसेना-भाजप-रिपाइं (आरपीआय) नेते, कार्यकर्त्यांचा विजय

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघातील जनतेने निवडणूक हाती घेतली होती. शिवसेना-भाजप-रिपाइं (आरपीआय)चे नेते, कार्यकर्त्यांनी झटून आणि झोकून देऊन प्रचार केला. महायुतीच्या कार्यकर्त्यांपुढे विरोधकांच्या राज्यातील ‘फौजा’ निष्क्रिय ठरल्या. भाजपने शिवसेनेपेक्षा दोन पाऊले पुढे जाऊन काम केल्याने आपला सव्वा दोन लाखाच्या फरकाने विजय झाल्याचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले. अपेक्षेपेक्षा अधिक मताधिक्य मिळाल्याचेही ते म्हणाले. तसेच पराभवाची जाणीव झाल्यानेच पवार कुटुंबातील सदस्य गल्लोगल्ली फिरत होते. त्यांच्यावर दडपण होते. राज्यातील कार्यकर्त्यांच्या ‘फौजा’ देखील त्यांनी आणल्या होत्या. परंतु, त्याचा काही उपयोग झाला नाही, असेही बारणे म्हणाले. 

पत्रकार परिषदेत बोलताना श्रीरंग बारणे म्हणाले, रायगडचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, पुणे जिल्हाध्यक्ष आमदार बाळा भेगडे, रायगडचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी खासदार राम ठाकूर यांनी शिवसेनेपेक्षा दोन पाऊले पुढे जाऊन काम केले. आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी मनापासून काम केले. त्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला आहे.

  • देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा झंझावता होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खनकर भूमिका घेतल्याने महायुतीला घवघवीत यश मिळाले असल्याचे सांगत बारणे म्हणाले, मावळ लोकसभा मतदारसंघाकडे देशाचे लक्ष लागले होते. पार्थ पवार केवळ उमेदवार होते. निवडणूक अजित पवार स्वत: लढवत होते. मावळात त्यांनी तळ ठोकला होता. राज्यभरात प्रचाराला देखील ते गेले नव्हते. पराभवाची जाणीव झाल्यानेच पवार कुटुंबातील सदस्य गल्लोगल्ली फिरत होते. त्यांच्यावर दडपण होते. राज्यातील कार्यकर्त्यांच्या ‘फौजा’ देखील त्यांनी आणल्या होत्या. परंतु, त्याचा काही उपयोग झाला नाही. मावळातील जनता विकासाच्या पाठिशी ठामपणे उभी राहिली.

बारणे म्हणाले, पाच वर्ष मतदारसंघात केलेली कामे, जनतेशी समरुप होऊन त्यांच्यात मिसळणे, त्यांच्या सुखदु:खात सहभागी होत होतो. मतदारांशी माझे जिव्हाळ्याचे नाते जोडले आहे. त्यामुळे मतदारांनी स्वत: निवडणूक हाती घेतली होती. सर्वसामान्य लोक माझ्यासोबत होते. त्यामुळे मला विजयाची निश्चित खात्री होती. माझ्यावर कोणतेही दडपण नव्हते. मला अपेक्षेपेक्षा जास्त मते मिळाल्याचे बारणे म्हणाले. उरण, कर्जत, पनवेल, मावळ, पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातून मला अपेक्षेपेक्षा जास्त मते मिळाली आहेत. माझा अंदाज अचूक होता. राष्‍ट्रवादीच्या उमेदवार जास्त मते घेईल, असा अंदाज होता. परंतु, त्यापेक्षा कमी मते पडली आहेत, असेही बारणे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.