Chinchwad Crime News : रावण टोळीतील मोक्काच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपींना कराड मधून अटक

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कुविख्यात रावण टोळीच्या सदस्यांना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने कराड पोलिसांच्या मदतीने कराड येथून अटक केली. तसेच फायरिंगच्या दोन गुन्ह्यात फरार असलेल्या एका सराईत आरोपीला देखील गुंडा विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.

सुरज चंद्रदत्त खपाले (वय 22, रा. रोकडेवस्ती, चिखली), हृतिक उर्फ मुंग्या रतन रोकडे (वय 21, रा. रोकडेवस्ती, चिखली), सचिन नितीन गायकवाड (वय 21, रा. चिखली गावठाण), अक्षय गोपीनाथ चव्हाण (वय 24, रा. चिखली गावठाण) अशी अटक केलेल्या रावण टोळीतील मोक्काच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तसेच फायरिंगच्या दोन गुन्ह्यात अनिरुद्ध उर्फ बाळा उर्फ विकी राजू जाधव (वय 24, रा. जाधववस्ती, रावेत) फरार होता. त्यालाही पोलिसांनी अटक केली आहे.

रावण टोळीतील अटक केलेल्या सदस्यांवर चिखली पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. तसेच पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्यांच्यावर मोक्काची देखील कारवाई केली आहे. हे आरोपी फरार होते. गुंडा विरोधी पथकाच्या पोलिसांनी दहा दिवस गोवा, महाबळेश्वर, कराड येथे वास्तव्य करून आरोपींचा ठावठिकाणा शोधला.

हे आरोपी कराड तालुक्यातील घारेवाडी गावच्या जवळ असल्याची माहिती मिळाल्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलीस आणि कराड पोलिसांनी मिळून आरोपींना सापळा लावून अटक केली. तसेच रावण टोळीचा आणखी एक सक्रिय सदस्य अनिरुद्ध जाधव याला देखील शिताफीने पकडले. अनिकेत हा चोपडा पोलीस ठाणे जळगाव, उत्तमनगर पोलीस ठाणे पुणे शहर आणि वाकड पोलीस ठाण्यातील तीन गुन्ह्यात फरार होता.

आरोपी सुरज, हृतिक, सचिन आणि अक्षय या आरोपींना चिखली पोलिसांच्या तर आरोपी अनिकेत याला वाकड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. अनिकेत याच्याकडून पोलीसांनी दोन पिस्टल आणि पाच जिवंत काडतूसे जप्त केली आहेत.

ही कारवाई गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने, पोलीस अंमलदार हजरत पठाण, प्रवीण तापकीर, गंगाराम चव्हाण, विजय तेलेवार, गणेश मेदगे, रामदास मोहिते, शुभम कदम, ज्ञानेश्वर गिरी, तांत्रिक विश्लेषण विभागाचे सहाय्यक फौजदार राजेंद्र शेटे, पोलीस हवालदार नागेश माळी यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.