Election News : महापालिका, जिल्हा परीषद, पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया स्थगित

एमपीसी न्यूज – राज्यातील महापालिकांच्या निवडणुकांबाबत अनिश्चितता असतानाच राज्य निवडणुक आयोगाने राज्यातील 25 जिल्हा परिषद, महापालिका व पंचायत समित्यांची निवडणुक प्रकिया स्थगित केली असून राज्य निवडणुक आयोगाने (Election News)  त्याबाबत परिपत्रक काढून माहिती दिली आहे.

 

राज्य शासनाने महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 मध्ये केलेल्या दुरुस्तीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद, महापालिका, पंचायत समित्यांच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत.

 

दरम्यान, शिंदे फड़णवीस सरकारने महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचनेत बदल केला होता. तर जिल्हा परिषदेतील वाढीव आणि गणात देखील बदल करण्यात आले होते. त्यानंतर ही प्रक्रीया पुन्हा राबविण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी उलटणार असून त्याचबरोबर राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकांच्या प्रक्रियेवर आणि आरक्षणाच्या प्रक्रियेवर दिलेल्या स्थगितीनंतर आता या निवडणुका होण्यासाठी पुढचे वर्ष उजाडणार आहे, असे चित्र स्पष्ट झाले आहे.

 

राज्यातील 25 जिल्हा परिषदा आणि 284 पंचायत समित्यांच्या आरक्षणाची अंतिम अधिसूचना शुक्रवारी जाहीर होणार होती. पण निवडणुक आयोगाने निर्णय घेत जिल्हा परिषदांमधील जाहीर केलेली मतदार यादीची प्रक्रीयाही स्थगित करण्यात आल्याचे राज्य निवडणूक  आयोगाच्या परिपत्रकात म्हंटले आहे. त्याचबरोबर या संदर्भातील सूचना सदर जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत.

 

महापालिका निवडणुकाही स्थगित

 

महापालिकेतील सदस्य संख्येतील बदल करणारा आणि आरक्षणाची प्रक्रिया रद्द करणारा निर्णय गुरुवारी शिंदे फडणवीस सरकारने घेतला होता. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णय शिंदे सरकारने बदलला. त्यावर निर्णय घेत राज्य निवडणूक आयोगाने तातडीने सर्व निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.