Mumbai News : होय मुख्यमंत्र्यांनी माझ्या कामाची प्रशंसा केली, माझे कितीही पुतळे जाळा आरसा दाखवणारच – नवाब मलिक

एमपीसी न्यूज – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्या कामाची प्रशंसा केली. संपूर्ण मंत्रीमंडळ माझ्या पाठीशी असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. माझे कितीही पुतळे जाळा, मी तुम्हाला आरसा दाखवणारच असा इशाराही त्यांनी भाजपला दिला.

माझ्या पाठिशी जसे मंत्रीमंडळ आहे तसे आदरणीय पवारसाहेब व पक्ष पाठिशी असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले. माझी लढाई ही अन्यायाविरोधात आहे. सध्या ही लढाई लढण्यासाठी मी एकटा पुरेसा असून ही लढाई पूर्णत्वास नेल्याशिवाय थांबणार नाही असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला आहे. माझे कितीही पुतळे जाळा मी तुम्हाला आरसा दाखवणारच… आरसा दाखवल्यावर इतके का घाबरताय? असा सवालही मंत्री मलिक यांनी भाजपला केला आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल ट्वीटरवर मला एका जनावराची उपमा देण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपचे नेते नेहमीच प्राण्यांची नावे देत असतात. त्यातून त्यांची काय संस्कृती आहे हे दिसून येते असा टोलाही त्यांनी लगावला. भाजपचे नेते माणसाला माणूस समजत नाहीत. माणसाला जनावराची उपमा देणे ही यांची संस्कृती आहे. या उपाधीमुळे आमची इज्जत जात नाही उलट भाजपची काय मानसिकता आहे हे स्पष्ट होते असेही मंत्री मलिक म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.