Nigdi News : देहूरोड-निगडी मार्गावर आढळले दुर्मिळ भारतीय स्टार कासव

एमपीसी न्यूज – देहूरोड-निगडी मार्गावर दुर्मिळ असलेले भारतीय स्टार कासव गुरुवारी (दि. 24) सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास आढळले. स्केल्स अँड टेल्स वाईल्ड लाईफ ऍनिमल रेस्क्यू फाउंडेशन पुणे आणि वाईल्ड लाईफ रेस्क्युअर्स् ऑफ मावळ संस्थेच्या स्वयंसेवकांनी या कासवाला पुढील उपचारासाठी नेले.

गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास मंगेश गणपत जाधव आणि श्रीमंत शिंदे यांना देहूरोड-निगडी मार्गावरून जाताना रस्त्याच्या मध्यभागी एक कासव दिसले. याची त्यांनी स्केल्स अँड टेल्स वाईल्ड लाईफ ऍनिमल रेस्क्यू फाउंडेशन पुणे यांना माहिती दिली. माहिती मिळताच रितेश साठे, विशाल बोडके, आशिष चांदेकर, निखिल कुंभार, विशाल पाचुंदे, टिपूसुलतान मुजावर, आकाश सूर्यवंशी, केदार ढेपे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

भारतात आढळणारे भारतीय स्टार कासव असल्याचे निदर्शनास आल्याने स्वयंसेवकांनी त्याला रेस्क्यू केले. मात्र कासवाची स्थिती चांगली नसल्याने त्याला तात्काळ उपचाराची गरज होती. त्यामुळे स्वयंसेवकांनी कासवाला पुणे येथील रेसक्यू चॅरिटेबल ट्रस्ट येथे पाठवले. तिथे उपचार घेतल्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात येणार आहे.

इंडियन स्टार टॉरटाइज हे दुर्मिळ जातीचे कासव आहे. ते भारत आणि श्रीलंकेत आढळते. भारतात आंध्रप्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, ओडिसा आणि पश्चिम बंगालमध्ये त्याचा अधिवास आहे. मात्र यांची संख्या खूपच कमी आहे. आज भारतामध्ये कित्येक ठिकाणी ह्या दुर्मिळ कासावांची अवैधरित्या विक्री आणि तस्करी होत असल्यामुळे ह्यांची संख्या खूप कमी झाली आहे.

काहीजण आपल्या हौसेसाठी स्टार कासवांची खरेदी करतात. घरी पाळण्यासाठी आणतात आणि निगा राखता येईनासे झाले की कासवाला सोडून देतात. वन्यजीव रक्षण कायदा 1972 नुसार भारतीय कासवांना घरी पाळणे, डांबून ठेवणे, विक्री करणे, तस्करी करणे हा गुन्हा आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.