Omicron News : शहरातील ‘ओमायक्रॉन’चे दहाही रुग्ण संसर्गमुक्त, उपचाराधीन एक रुग्ण शहराबाहेरील

एमपीसी न्यूज – कोरोनाचा नवीन विषाणू असलेल्या ‘ओमायक्रॉन’चा संसर्ग झालेले पिंपरी-चिंचवड शहरातील दहा रुग्ण संसर्गमुक्त झाले असून सर्वांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, सद्यस्थितीत शहराबाहेरील ‘ओमायक्रॉन’चा एक रुग्ण शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील रहिवासी असलेला ‘ओमायक्रॉन’चा एकही रुग्ण नाही. वेगाने फैलावणा-या ‘ओमायक्रॉन’ला तूर्तास तरी रोखण्यात महापालिका प्रशासनाला यश आले. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

कोरोनाचा डेल्टा, डेल्टा प्लस असे व्हेरियंट होते. आता नव्याने आलेला ओमायक्रॉन हा व्हेरियंट अधिक वेगाने फैलावतो. 70 पट अधिक वेगाने ओमायक्रॉन पसरत असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले होते, त्यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले होते. आफ्रिका आणि युरोपीय देशांमध्ये ओमायक्रॉन या नव्या उत्परिवर्तित विषाणूचा प्रादुर्भाव होत आहे. केंद्र व राज्य शासनाने खबरदारीच्या उपाययोजना करण्यास सूचित केले आहे. त्यानुसार महापालिकेकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटच्या अनुषंगाने महापालिकेतर्फे तपासणी मोहीम सुरू आहे.

शहरात नायजेरियातून आलेल्या नागरिकांची 25 नोव्हेंबरला तपासणी करण्यात आली आणि ओमायक्रॉनने पिंपरी-चिंचवड शहरात शिरकाव केला. 5 डिसेंबर रोजी नायजेरीतून आलेल्या 3 आणि त्यांच्या संपर्कातील 3 अशा 6 जणांना संसर्ग झाला होता. एकाचदिवशी 6 रुग्णांना संसर्ग झाल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यातील 6 रुग्णांपैकी 5 रुग्ण लक्षणेविरहित होते. 10 डिसेंबर रोजी या 6 रुग्णांपैकी 4 रुग्णांचा रिपोर्ट निगेटीव्ह आला. त्यांना डिस्चार्ज दिला होता. त्याचदिवशी नवीन 4 जणांना ओमायक्रॉनची लागण झाली. हे चारही रुग्ण आता संसर्गमुक्त झाले.

पहिल्या टप्प्यात 6 आणि उर्वरित 4 रुग्ण रविवारी ओमायक्रॉनमुक्त झाले. त्याचवेळी रविवारी ओमायक्रॉनचा आणखी 1 रुग्ण आढळला. पण, हा रुग्ण महापालिका कार्यक्षेत्राबाहेरील असून शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. त्याची प्रकृती स्थिर आहे. आजपर्यंत शहरात ओमायक्रॉनचे एकूण 11 रुग्ण आढळले. त्यातील 10 रुग्ण संसर्गमुक्त झाले असून सद्यस्थितीत शहराबाहेरील एका रुग्णावर उपचार सुरु आहेत.

परदेशातून आलेले, त्यांच्या संपर्कातील 688 जणांचे अहवाल निगेटिव्ह – डॉ. लक्ष्मण गोफणे

परदेशातून पिंपरी-चिंचवड शहरात आलेले आणि त्यांच्या संपर्कातील 1003 जणांची तपासणी केली. त्यापैकी 728 जणांचे अहवाल आले आहेत. त्यात परदेशातून आलेल्या प्रवाशांपैकी 19 आणि त्यांच्या संपर्कातील 21 जण कोरोना पॉझिटिव्ह आले. तर, 688 जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत.

परदेशातून आलेल्या 19 पॉझिटीव्ह रुग्णांपैकी 4 रुग्णांना ‘ओमायक्रॉन’ची बाधा झाली. तर, त्यांच्या संपर्कातील 7 जणांनाही ओमायक्रॉनची बाधा झाली. आजपर्यंतच्या 11 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 10 जण ओमायक्रॉनमुक्त झाले आहेत.

11 वा रुग्ण महापालिका क्षेत्राबाहेरील असून शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील ‘ओमायक्रॉन’चा संसर्ग झालेला एकही रुग्ण नसल्याचे वैद्यकीय विभागप्रमुख डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.