Pimpri News : आस्थापनेमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस झालेल्यांनाच ‘एंट्री’ द्या; आयुक्तांचे आदेश

एमपीसी न्यूज – सर्व शाळा, महाविद्यालये, दुकाने, खासगी व सरकारी कार्यालये, बँका, औद्योगिक आस्थापना, उपहारगृहे, बार, मॉल, इतर आस्थापनांनी कर्मचा-यांचे लसीचे दोन्ही डोस झाल्याची खातरजमा करावी. लसीकरण प्रमाणपत्रासह माहिती ठेवावी तसेच सर्वसामान्यपणे काही अपवादात्मक परिस्थिती, अति तातडीची बाब वगळता आस्थापना, कार्यालयात येणा-या सर्व नागरिकांनाही लसीकरणाचे दोन्ही डोस झाल्याची खात्री करुनच प्रवेश देण्यात यावा. नो-मास्क, नो एंट्री, नो-वॅक्सीन नो एंट्री हे धोरण अंवलबवावे, असे आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत.

कोविड आणि ओमायक्रॉनचा पिंपरी-चिंचवड शहरात प्रसार होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून आता लग्न समारंभ, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक व राजकीय कार्यक्रमांसाठी उपस्थित राहणाऱ्यांची मर्यादा 50 केली असून अंतिम संस्कारासाठी केवळ 20 लोकांना मुभा देण्यात आली आहे.

बंदिस्त ठिकाणी किंवा खुल्या दालनात संपन्न होणाऱ्या लग्न समारंभांसाठी उपस्थितांची मर्यादा 100 वरून 50 करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे दालनात किंवा खुल्या जागेत होणाऱ्या धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक किंवा राजकीय कार्यक्रमांसाठी ही मर्यादा 50 करण्यात आली आहे. हे निर्बंध 31 डिसेंबर 2021 च्या रात्री 12 पासून अंमलात येणार आहेत. अंतिम संस्कारासाठी उपस्थितांची मर्यादा आता अधिकतम 20 असणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.